‘पीएमआरडीए’च्या अर्थसंकल्पात भोसरी विधानसभेचा ‘डंका’
महायुती सरकारची भाजपा आमदार महेश लांडगे यांना ‘ताकद’
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या माध्यमातून पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी १ हजार ९६७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना आणि आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या कामाला चालनादेण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पामध्ये भोसरी विधानसभा मतदार संघाचा ‘डंका’ आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएमआरडीएचा ३ हजार ८३८कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. त्यामध्ये विविध प्रकल्पांना ‘बुस्टर’ दिला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे प्रतिनिधीत्व करत असलेल्या भोसरी मतदार संघातील आवास योजना, नदी सुधार प्रकल्प, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या कामाला अर्थसंकल्पामध्ये झुकते माप दिले आहे.
प्राधिकरण पेठ क्रमांक १२ येथे गृहप्रकल्प योजना अंतर्गत टप्पा क्रमांक १ मध्ये ४ हजार २८९ सदनिका निर्माण होत आहेत. टप्पा- २ मधील ६ हजार ४५२ सदनिका प्रस्तावित आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राची उभारणीला गती देण्यात आली असून, प्रदर्शन हॉलच्या कामाला पीपीपी तत्वावर विकसित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. यासह अग्निशमन केंद्र, प्रशासकीय इमारत, बस डेपो, मेट्रो स्टेशन आदी सुविधांसाठी सुमारे ९८२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया :
पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना आणि औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी आम्ही सातत्त्याने आग्रही आहोत. नुकतेच पर्यावरण विभागाने नदी सुधार प्रकल्पासाठी मंजुरी दिली. त्यानंतर आता पीएमआरडीएच्या माध्यमातून संबंधित प्रकल्पाला निधी उपलब्ध करण्यात आला आहे. शहराच्या विकासामध्ये सदर प्रकल्प ‘माईलस्टोन’ राहतील, यात शंका नाही.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा.





