‘सगळे पक्ष भाजपात विलीन करून..’; बच्चू कडू यांचं मोठं विधान

मुंबई : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार आहेत, तर मग सगळे पक्ष विलीन करून भाजपात जाणं हा चांगला मार्ग आहे, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
बच्चू कडू म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे, हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढत अजित पवारांना मुख्यमंत्री करणार असतील, तर लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढतो, त्यांना मुख्यमंत्री करतात. इथे उलटे होत आहे.
हेही वाचा – मोशी येथील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भास्कर शिवले प्रथम
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचं सर्व देवेंद्र फडणवीस हे ठरवणार, हाही मोठा संभ्रम आहे. कुणाच्या नेतृत्वात निवडणूक काढायची, कोण मुख्यमंत्री होणार हेही देवेंद्र फडणवीस ठरवणार. त्यापेक्षा सगळे पक्ष विलीनकरून भाजपात जाणं, हाच चांगला मार्ग आहे, असा टोला आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बद्दल विचारलं असता. ते म्हणाले, बावनकुळे हे माझे सुद्धा मित्र आहेत. पण, ते माझ्याच मतदारसंघात येऊन मला पाडण्यासाठी रचना करा असं सांगतात. त्यामुळे भेट भगतसिंह आणि राजगुरूसारखी झाली पाहिजे. अफजल खानासारखी होऊ नये, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.





