#Covid-19: “हरिद्वारच्या कुंभमेळ्याने करोनाचा अणुबॉम्बच फोडला”- शिवसेना
![Shocking! The old woman who went for Aquarius became a super spreader; Thirty-three people from Bangalore died](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/kumbh-mela.jpg)
मुंबई |
करोनासंदर्भातली आणीबाणी फक्त महाराष्ट्रातच उद्भवली आहे काय? संपूर्ण देशच कोरोनाच्या जबडय़ात अडकला आहे. महाराष्ट्र लपवाछपवी करून रुग्णांचा आकडा लपवत नाही. कारण खोटेपणा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला नाही. हरिद्वारच्या कुंभमेळय़ाने करोनाचा अणुबॉम्बच फोडला. कुंभमेळय़ात सहभागी झालेल्या शेकडो साधू-संत आणि गंगेत डुबकी मारणाऱ्या पवित्र आत्म्यांना कोरोना झाला आहे. आता हे लोण पसरत जाईल असं शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हटलं आहे. देशभरात कोरोना धुमाकूळ घालीत असताना धर्म, सण, उत्सव यावर नियंत्रण ठेवावेच लागेल असं मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे. “मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाउन केले तर लोक रस्त्यावर उतरतील असे विरोधी पक्ष ओरडत होता. तसे काहीच घडताना दिसत नाही. लोकांनी मुख्यमंत्र्यांचे ऐकले आहे. विरोधी पक्षाने 1 मेपर्यंत घरीच बसावे,” असा सल्ला यावेळी शिवसेनेने दिला आहे.“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पंधरा दिवसांसाठी कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. 1 मेच्या सकाळपर्यंत राज्यात संचारबंदी म्हणजे 144 कलम लागू करून करोनाविरुद्धच्या दुसऱ्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे. कडक निर्बंध म्हणजे एकप्रकारे लॉकडाउनच आहे, पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी रात्री जनतेला विश्वासात घेऊन या लॉकडाउनची घोषणा केली. त्याआधी सात-आठ दिवस सरकार लॉकडाउनसंदर्भात जनतेची मानसिकता तयार करीत होते. सरकारच्या मनात आले म्हणून मागचा पुढचा विचार न करता लॉकडाउन लादले असे केले नाही,” असा टोला शिवसेनेने केंद्र सरकारला लगावला आहे.
“उत्तर प्रदेशात मंगळवारी एका दिवसात 18 हजार कोरोना रुग्ण आढळून आले. आठवडाभरात त्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत 204 टक्के एवढी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तर साधू-संन्यास-तपस्वी, पण स्वतःच विलगीकरणात पोहोचले. मुख्यमंत्री कार्यालयात कोरोनाची ‘लहर’ आली आहे. तेथील माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गुजरातमधील सुरत वगैरे ठिकाणी कोरोनामुळे मृतांचा खच पडत असून स्मशानांतील लोखंडी सळय़ाही वितळून गेल्या, इतके मृतदेह तेथे दहन केले जात आहेत. झारखंड, छत्तीसगढ येथील सरकारी रुग्णालयांत मृतांचा खच पडला आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात या राज्यांत उच्च न्यायालयास हस्तक्षेप करून ‘लॉकडाउन करा’ असे सांगावे लागत आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्राने घेतले तसे इतर राज्यांनी कोरोनाचे प्रकरण गांभीर्याने घेतलेले दिसत नाही,” अशी टीका शिवसेनेने केली आहे. “करोनाचा विषाणू भगवा किंवा हिरवा अशा कोणत्याच रंगाची आणि धर्माची पर्वा करीत नाही. हा विषाणू अमानुष आहे व कुणालाच सोडत नाही. सध्याच्या संकटाच्या स्थितीत लोकांनी शिस्त पाळायलाच हवी, पण शिस्त फक्त मरकजवाल्यांनी किंवा रमजानवाल्यांनीच पाळावी, चर्च किंवा गुरुद्वारांनी पाळावी या मानसिकतेतून आता बाहेर पडले पाहिजे. ही लढाई मानवता आणि देश वाचविण्यासाठी आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात निर्बंधांची घोषणा करताना याच माणुसकीला प्राधान्य दिले आहे. लॉकडाउन झाले तर गोरगरीबांच्या चुली विझतील, त्यांनी खायचे काय? हा प्रश्न आहेच. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या गरीब वर्गासाठी 5,476 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. रोजी थांबली तरी रोटी थांबणार नाही, सरकार काळजी घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात काय सुरू, काय बंद याची यादी जाहीर झाली आहे. अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वाहतूक सुरू असेल. उद्योग, व्यापार यांवर निर्बंध नाहीत. मुख्य म्हणजे मागच्याप्रमाणे लॉकडाउनची घोषणा होताच जो जेथे आहे तेथेच अडकून पडला असे श्री. ठाकरे यांच्या घोषणेत नाही. लोकांना विश्वासात घेऊन ’बंदची आखणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बंद पुकारला, पण त्यांनी लोकांसाठी ज्या घोषणा केल्या त्या योग्य आहेत. 7 कोटी लोकांना सरकार एक महिना मोफत गहू-तांदूळ देणार आहे. शिवभोजन थाळी महिनाभर मोफत दिली जाईल. शेवटी ‘बंद’ काळात रिकाम्या थाळय़ा वाजवून पोट भरणार नाही. भरलेल्या थाळय़ाच द्याव्या लागतील. नाहीतर भुकेचा आगडोंब उसळून वणवा भडकेल. मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा आगडोंब उसळू नये याचीच फिकीर केली आहे. बारा लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा केले जातील. नोंदणीकृत पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 1500 रुपये, 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रुपये देण्याचे सरकारने ठरविले आहे. संचारबंदी काळात त्यांच्या पोराबाळांची आबाळ होऊ नये यासाठीच ही सोय सरकारने केली आहे व हे सर्व माणुसकीला धरून आहे,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.
वाचा- कोरोनाच्या निर्बंधांमुळे ताडी व्यावसायिक आर्थिक विवंचनेत