Diwali 2026: मिठाई खरेदी करताना सावधान! तुकाराम मुंढेंचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
उत्पादन आणि एक्सपायरी तारीख, FDA परवाना व बिलावरील FSSAI क्रमांक तपासण्याचे आवाहन; भेसळीबाबत टोल-फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार

मुंबई : दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून, ८ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन असल्याने घराघरांत फराळ आणि मिठाई खरेदीची लगबग सुरू आहे. मात्र, सणाच्या आनंदात मिठाईच्या माध्यमातून आरोग्याशी तडजोड होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष खबरदारी घेतली आहे. FDA चे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी विशेष व्हिडिओ जारी करत मिठाई खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
“सुरक्षित अन्न हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे; ती केवळ सणापुरती भेटवस्तू नाही,” असे स्पष्ट करत सार्वजनिक आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
मिठाई खरेदी करताना या गोष्टी तपासा
मिठाई खरेदी करताना पॅकेटवरील उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि ‘बेस्ट बिफोर’ तारीख आवर्जून तपासावी. मिठाई विक्री करणाऱ्या दुकानाकडे आवश्यक FDA परवाना आहे की नाही, याची खात्री करावी. तसेच खरेदीच्या बिलावर FSSAI परवाना क्रमांक नमूद आहे का, हेही पाहावे.
गरजेपुरतीच मिठाई खरेदी करावी आणि ती शक्यतो दोन ते तीन दिवसांत संपवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मिठाई फ्रीजमध्ये ठेवल्याने तिचा दर्जा कायम राहीलच असे नाही, याकडेही नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले आहे. मिठाई उत्पादकांनी अन्नपदार्थांमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर करावा. गिफ्ट पॅकमधील इतर खाद्यवस्तूंचाही दर्जा योग्य असणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन किंवा निकृष्ट वस्तू आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – गोकुळच्या वादात सरकार हस्तक्षेप करणार नाही; फडणवीसांची स्पष्ट भूमिका
ऑनलाइन मिठाई मागवताना घ्या काळजी
सध्या ऑनलाइन मिठाई मागवण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पार्सल मिळाल्यानंतर पॅकेटची स्थिती, एक्सपायरी डेट आणि ब्रँडची माहिती तपासावी. पॅकेजिंग खराब असल्यास किंवा उत्पादनाबाबत शंका असल्यास ते स्वीकारण्यापूर्वी आवश्यक खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भेसळयुक्त मिठाई आढळल्यास येथे करा तक्रार
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही नागरिकाला भेसळयुक्त, निकृष्ट किंवा खराब दर्जाची मिठाई आढळल्यास तातडीने तक्रार नोंदवण्याचे आवाहन FDA कडून करण्यात आले आहे. यासाठी नागरिकांना Complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार करता येईल. तसेच १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रकरणाची दखल घेऊन नियमानुसार कारवाई केली जाईल. मिठाई उत्पादक आणि दुकानदारांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करून ग्राहकांचा विश्वास कायम ठेवावा, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.




