शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!
ठाकरे गटाच्या प्रतियुक्तिवादाकडे लक्ष; ‘एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही’, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईतील सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज (२५ नोव्हेंबर) सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. मागील सुनावणीत म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी प्रतियुक्तिवादाला सुरुवात केली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत ठाकरे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
‘एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही’
१९ नोव्हेंबरच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही, असा युक्तिवाद केला. गुवाहाटीत राहून पक्षाचा व्हीप कोण असेल, हे शिंदे ठरवू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या संख्येलाच ‘मूळ राजकीय पक्ष’ मानणे ही मोठी चूक असल्याचे सांगत, कोणताही आमदार स्वतःहून राजकीय पक्ष होऊ शकत नाही, असा मुद्दा सिब्बल यांनी मांडला.
हेही वाचा – शरणकुमार लिंबाळे यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड अभिमानास्पद!
मागील सुनावणीत काय घडले?
शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ध्रुव मेहता यांनी युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी प्रतियुक्तिवादाला सुरुवात केली. बंडखोरीनंतर २३ जून रोजी एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतून राज्यपालांना पत्र पाठवून आपणच शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला होता. पक्षांतर्गत वाद असल्यास त्याबाबतचे पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना द्यायला हवे होते. राज्यपालांना थेट पत्र पाठवणे योग्य नव्हते, असा मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केला.
सभागृहात कार्यवाही न करता भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली निवड आणि व्हीप बजावण्याची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा दावाही ठाकरे गटाकडून करण्यात आला.
पक्षांतर्गत मतभेद की पक्षांतर?
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ठाकरे गटाला ‘पक्षांतर्गत मतभेद’ (Dissent) आणि ‘पक्षांतर’ (Defection) यातील कायदेशीर फरक स्पष्ट करण्यास सांगितले. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शिंदे गटाची भूमिका केवळ पक्षांतर्गत मतभेद मानता येणार नाही, तर ते पक्षांतर ठरते, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
या प्रकरणात दोन्ही गटांकडून मांडण्यात आलेले युक्तिवाद आणि पक्षाचे नाव व चिन्ह याबाबतचा कायदेशीर पेच लक्षात घेता आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




