गडचिरोलीत लोहखनिजाचा शोध घेण्यासाठी ६२४ हेक्टर वनक्षेत्रात ड्रिलिंग; खासगी कंपनीला सरकारची परवानगी
एटापल्ली तालुक्यातील वेलमागडजवळ ७८ ठिकाणी बोअरहोल ड्रिलिंग होणार; सर्वेक्षणासाठी एक वर्षाची मुदत, मात्र प्रत्यक्ष उत्खननाला परवानगी नाही.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील लोहखनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावाजवळील ६२४ हेक्टर राखीव वनक्षेत्रात लोहखनिजाचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने मे. ओमसाईराम स्टील्स अँड अलॉय प्रा. लि. या खासगी कंपनीला परवानगी दिली आहे. या क्षेत्रात ७८ ठिकाणी बोअरहोल ड्रिलिंग करून जमिनीखालील लोहखनिज साठ्यांचा अभ्यास केला जाणार आहे. हे सर्वेक्षण एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
६२४ हेक्टर वनक्षेत्रात ७८ ठिकाणी ड्रिलिंग
राज्य शासनाच्या वन विभागाने ३० ऑक्टोबर रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार वेलमागड परिसरातील ६२४ हेक्टर राखीव वनजमिनीवर लोहखनिजाचा शोध घेण्यासाठी ७८ ठिकाणी बोअरहोल ड्रिलिंग केले जाणार आहे. या सर्वेक्षणातून परिसरातील लोहखनिज साठ्यांचे प्रमाण आणि उपलब्धता यांचा अभ्यास केला जाणार आहे.
गडचिरोलीला स्टील सिटी बनवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर लोहखनिजाच्या शोधासाठी मिळालेली ही परवानगी जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
केंद्र सरकारकडूनही मिळाली अंतिम मान्यता
या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाने २५ जून २०२५ रोजी तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर कंपनीने आवश्यक अटींच्या पूर्ततेचा अहवाल सादर केला. या प्रक्रियेनंतर २९ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मान्यता देण्यात आली. आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार ७८ ठिकाणी ड्रिलिंग करण्यास परवानगी मिळाली आहे.
हेही वाचा – पुणे शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर; पुणे-नाशिक महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत
सर्वेक्षणासाठी कठोर अटी; प्रत्यक्ष उत्खननाला परवानगी नाही
खासगी कंपनीला सर्वेक्षणाची परवानगी देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष खाणकाम किंवा वनजमिनीचा वापर करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. सर्वेक्षणादरम्यान वनक्षेत्राचे संरक्षण व्हावे यासाठी काही कठोर अटी घालण्यात आल्या आहेत.
- वनक्षेत्रात मजुरांसाठी कॅम्प उभारता येणार नाहीत.
- ड्रिलिंगचे काम केवळ दिवसा करावे लागेल.
- सर्वेक्षणासाठी नवीन पायवाटा तयार करता येणार नाहीत.
- ड्रिलिंगनंतर वापरात नसलेली बोअरहोल तातडीने बुजवणे बंधनकारक असेल.
- सर्वेक्षण निर्धारित कालावधीत पूर्ण करावे लागेल.
गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष
एटापल्लीतील ६२४ हेक्टर वनक्षेत्रात होणाऱ्या या सर्वेक्षणातून नेमके किती लोहखनिज साठे उपलब्ध आहेत, हे स्पष्ट होणार आहे. या निष्कर्षांवरून गडचिरोलीच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पुढील दिशा ठरू शकते. मात्र, वनक्षेत्राचे संवर्धन आणि औद्योगिक विकास यांचा समतोल राखणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
सर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती
- ठिकाण : वेलमागड, एटापल्ली तालुका, गडचिरोली
- वनजमीन : ६२४ हेक्टर
- ड्रिलिंग : ७८ बोअरहोल
- सर्वेक्षण कालावधी : एक वर्ष
- तत्त्वतः मान्यता : २५ जून २०२५
- अंतिम मान्यता : २९ जानेवारी २०२६
- प्रमुख अट : प्रत्यक्ष वनजमिनीचा वापर किंवा खनिज उत्खनन करण्याची परवानगी नाही.




