
पुणे ! प्रतिनिधी
विश्रांतवाडी, पुणे येथील गाथा लोखंडे हिने ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. सहा वर्षांखालील वयोगटात सहभागी होत गाथाने आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सोमनाथनगर, वडगाव शेरी येथील रामचंद्र सभागृहात ही स्पर्धा पार पडली.
एम्पॉवर शोतोकान कराटे, मल्टिस्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने भारती कराटे अकॅडमी आणि दिव्यालाभ योगा अँड फिटनेस स्टुडिओ यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वर्ल्ड कराटे अँड सेल्फ डिफेन्स ऑर्गनायझेशन, जर्मनी यांचे सहकार्य लाभले.
हेही वाचा – गोकुळच्या सत्तासंघर्षात नवा ट्विस्ट! संचालक संख्या वाढवण्यासाठी चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र?
गाथा ही प्रशिक्षक नितीन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. नियमित सराव, शिस्त, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने हे यश मिळवले. कराटेच्या माध्यमातून आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करत गाथाने क्रीडा क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. तिच्या या यशाबद्दल प्रशिक्षक नितीन कांबळे, कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




