अमेरिकेत भीषण विमान अपघात; रस्त्यावर खासगी विमान कोसळताच स्फोट, ९ जणांचा होरपळून मृत्यू

Plane Crash in America | अमेरिकेतील दक्षिण फ्लोरिडामध्ये एक भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा विमान अपघात घडला आहे. एक खासगी विमान थेट रस्त्याच्या मध्यभागी कोसळून झालेल्या प्रचंड स्फोटात विमानातील सर्व ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. विमान रस्त्यावर आदळताच मोठा आगडोंब उसळला आणि रस्त्यावर मोठा खोल खड्डा पडला. निवासी भागाच्या अगदी जवळ घडलेल्या या दुर्घटनेचे थरारक दृश्य जवळून जाणाऱ्या एका कारमधील प्रवाशांनी कॅमेऱ्यात टिपले असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अपघातग्रस्त विमान हे ‘लिअरजेट ६०’ (Learjet 60) या प्रकारातील खासगी जेट होते. दक्षिण फ्लोरिडातील एका निवासी भागावरून जात असताना हे विमान अचानक अनियंत्रित झाले आणि वेगाने थेट रस्त्यावर येऊन आदळले. जमिनीवर आदळताच विमानाचा प्रचंड मोठा स्फोट होऊन आगीचा गोळा आकाशात उसळला. या स्फोटामुळे डांबरी रस्त्यावर खोल खड्डा पडला आणि विमानाचे तुकडे सर्वत्र विखुरले गेले. अपघाताच्या वेळी विमानात ९ प्रवासी व क्रू सदस्य उपस्थित होते, त्या सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. विमान कोसळले तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना किंवा नागरिकांना याची झळ बसली का, याचा तपास केला जात आहे.
हेही वाचा
पुणे शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर; पुणे-नाशिक महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत
Palm Beach, Florida
#leerjet #planecrash #FYP https://t.co/WaNrbHxt9I
— Marc Blum (@TheRealMarcBlum) November 1, 2026
स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान रस्त्यालगत असलेल्या घरांपासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर कोसळले. विमान थेट घरांवर किंवा भरधाव वाहनांवर न आदळल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा मृतांचा आकडा आणखी मोठा असता. क्षणार्धात झालेल्या या अपघातानंतर परिसरात काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरले आणि स्थानिक नागरिकांमध्ये घबराट उडाली.
अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
विमान वेगाने आकाशातून जमिनीच्या दिशेने येताना आणि रस्त्यावर आदळताच आगीचा भडका उडतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. दुर्घटनेची तीव्रता पाहून हळहळ व्यक्त केली जात आहे. विमान अपघाताचे नेमके तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अमेरिकन विमान वाहतूक प्राधिकरणाकडून या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.




