इंडिया आघाडीच्या दिल्लीतील रॅलीला कॉकरोच जनता पार्टीचा पाठिंबा; मात्र सहभागी होणार नाही
ममता बॅनर्जी यांची अभिजीत दिपके यांनी घेतली भेट; पक्षाची स्वतंत्र ओळख कायम ठेवण्यासाठी रॅलीपासून दूर राहण्याचा निर्णय

नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर २०२६ रोजी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर राजधानीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीमध्ये अनेक प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. यामध्ये पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या भेटीचाही समावेश आहे.
कथित मतदान चोरी आणि निवडणूक आयोगाविरोधातील भूमिकेला कॉकरोच जनता पार्टीने समर्थन दिले आहे. मात्र, इंडिया आघाडीच्या १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रॅलीत पक्ष सहभागी होणार नसल्याचे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले. पक्षाची स्वतंत्र ओळख कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
ममता बॅनर्जींच्या भेटीमागील कारण काय?
ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी आपण भेट घेतली. नीट पेपरफुटीविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन सुरू असताना ममता बॅनर्जी यांनी आंदोलनाला समर्थन दिले होते. तसेच दिल्ली पोलिसांनी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली होती, त्यावेळीही ममता बॅनर्जी कॉकरोच जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या होत्या, असे दिपके यांनी सांगितले.
हेही वाचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महागोदा आरती; पर्यावरणपूरक सिंहस्थाचा संकल्प
रॅलीला पाठिंबा, पण सहभाग नाही
इंडिया आघाडीच्या रॅलीबाबत भूमिका स्पष्ट करताना दिपके म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टी या रॅलीचे पूर्णपणे समर्थन करते; मात्र पक्ष त्यात सहभागी होणार नाही. आमचा पक्ष स्वतंत्र असल्याने विरोधी पक्षांच्या रॅलीत सहभागी होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. कोणताही पक्ष किंवा संघटना मतदान चोरीविरोधात आंदोलन करत असेल, तर त्याला कॉकरोच जनता पार्टीचा पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी कॉकरोच जनता पार्टीने रॅलीला पूर्ण समर्थन दिल्याचे सांगितले. कोलकात्यात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार असून त्यासाठी सीजेपीच्या नेत्यांना निमंत्रित करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
दिल्लीतील रॅलीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
१ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या इंडिया आघाडीच्या रॅलीची तयारी जोरात सुरू आहे. आघाडीतील महत्त्वाचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने रॅलीला पाठिंबा देत असतानाही प्रत्यक्ष सहभाग टाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या राजकीय रणनीतीच्या पार्श्वभूमीवर सीजेपीची स्वतंत्र भूमिका चर्चेत आली आहे.




