‘ऑपरेशन ३.०’ची चर्चा मंत्री उदय सामंत यांनी फेटाळली
पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम; शेतकऱ्यांना मदत करणे हेच सरकारचे प्राधान्य असल्याचे स्पष्ट

हिंगोली : महाराष्ट्रात ‘ऑपरेशन ३.०’ किंवा कोणत्याही पक्षप्रवेशाची चर्चा सुरू नसल्याचे सांगत मंत्री उदय सामंत यांनी या चर्चांना फेटाळून लावले. सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी बंधू-भगिनींना मदत करणे हेच सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्योग विभागामार्फत आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेसाठी ते हिंगोली येथे आले होते.
स्थानिक उद्योजक आणि नागरिकांना गुंतवणुकीसाठी ‘रेड कार्पेट’ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित झाली आहे. मागील वर्षी एक लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले होते. यंदा दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; १९ पैकी १८ जागांवर विजय
छत्रपती संभाजीनगर येथे सुमारे ६० हजार कोटी रुपयांचे ऑटोमोटिव्ह प्रकल्प येत असून, त्याचा मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला मोठा फायदा होईल, असे सामंत यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांच्याबाबत ऑडिओ क्लिपवरून केलेल्या आरोपांबाबत बोलताना, दोघांकडेही समान क्लिप असल्याने या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे सामंत यांनी नमूद केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची डिलिमिटेशनबाबतची भूमिका आणि रायगडमधील महायुतीतील संभाव्य तणावाबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले.




