Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेत मोठे इनकमिंग; मूर्तिजापूरच्या पाच अपक्ष नगरसेवकांचा पक्षप्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाच नगरसेवकांनी समर्थकांसह बांधले शिवबंधन; शिवा मोहोड यांचाही पक्षात प्रवेश. दुसरीकडे, संत रुपलाल महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी बारी समाजाचे २ नोव्हेंबरला ‘आत्मक्लेष आक्रोश आंदोलन’.

अकोला : अकोला जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठे इनकमिंग झाले आहे. मूर्तिजापूर नगरपरिषदेतील पाच अपक्ष नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये संदीप दौलतराव सरनाईक, सारिता काळे पाटील, पूनम रवी मोडक, ममता कैलास महाजन आणि शुभांगी संदीप सरनाईक यांचा समावेश आहे. या पाचही नगरसेवकांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सहकारी ॲड. निलेश देशमुख यांची अकोल्यात भेट घेतली होती. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना शिवबंधन बांधले. या प्रवेशामुळे मूर्तिजापूर नगरपरिषदेत शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. आगामी काही दिवसांत अकोला जिल्ह्यातील आणखी काही मोठे राजकीय चेहरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती ॲड. निलेश देशमुख यांनी दिली.

दरम्यान, अकोल्यातील शिवा मोहोड यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मोहोड हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, महानंदचे संचालक, अकोला जिल्हा दूध संघाचे संचालक, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि अकोला महापालिकेचे माजी बांधकाम सभापती राहिले आहेत.

हेही वाचा –  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महागोदा आरती; पर्यावरणपूरक सिंहस्थाचा संकल्प

संत रुपलाल महाराजांच्या स्मारकासाठी बारी समाज आक्रमक

एक ऑक्टोबर २०२३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत शिरोमणी रुपलाल महाराज यांच्या जन्मस्थळी, अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. संत रुपलाल महाराज हे देशभरातील बारी समाजाचे आराध्य दैवत मानले जातात. या घोषणेनंतर बारी समाजाने आनंद व्यक्त केला होता.

मात्र, घोषणा होऊन तीन वर्षांहून अधिक काळ उलटला तरी स्मारक उभारणीच्या कामाला सुरुवात झालेली नसल्याचा आरोप देशभरातील बारी समाजाकडून करण्यात येत आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी केवळ घोषणा करून समाजाची दिशाभूल केली, असा आरोप राष्ट्रीय बारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र घोलप यांनी केला आहे. यासंदर्भात सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संत शिरोमणी रुपलाल महाराजांचे राष्ट्रीय स्मारक घोषित केल्याप्रमाणे उभारावे आणि त्यासाठी तातडीने काम सुरू करावे, या मागणीसाठी बारी समाजाच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी अंजनगाव सुर्जी येथे ‘आत्मक्लेष आक्रोश आंदोलन’ करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी देशभरातून बारी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे रमेशचंद्र घोलप यांनी सांगितले.

त्यामुळे संत रुपलाल महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा आगामी काळात चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button