TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोकुळ अध्यक्ष निवडीचा तिढा हायकोर्टात; महायुतीचे १२ संचालक पुढील बैठकीला उपस्थित राहणार?

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून १२ संचालकांना नोटीस; समविचारी आघाडीने शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर केला होता शिक्कामोर्तब

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय आणि सहकार क्षेत्रात घमासान सुरू आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. मात्र, अध्यक्ष निवडीच्या पहिल्या सभेला आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने निवडणूक होऊ शकली नाही. आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पोहोचला आहे.

समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक नसल्याचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने पहिल्या सभेला अनुपस्थित राहिलेल्या महायुतीच्या १२ संचालकांना नोटीस बजावली आहे. तसेच राज्य सरकारसह या १२ संचालकांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

महायुतीच्या १२ संचालकांना न्यायालयाची नोटीस

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी झालेल्या पहिल्या सभेत आवश्यक कोरम पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे सभा होऊ शकली नाही. यानंतर समविचारी आघाडीच्या संचालकांनी न्यायालयात धाव घेतली. अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम बंधनकारक नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये या याचिकेवर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने महायुतीच्या १२ संचालकांना नोटीस बजावून त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे.

हेही वाचा –  “आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार”; खरगेंच्या विधानाला मोदींचे प्रत्युत्तर

पुढील बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे महायुतीचे संकेत

दरम्यान, गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरून आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वादही चिघळला आहे. हसन मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर जातीवादी प्रचार केल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना सतेज पाटील यांनी, आपल्या मुलाचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे केले जात असताना आपल्याला जातीवादी म्हटले गेले नव्हते का, असा सवाल केला होता.

या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली आहे. गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीसाठी होणाऱ्या पुढील बैठकीला महायुतीचे संचालक उपस्थित राहतील, असे त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे न्यायालयाने बजावलेली नोटीस आणि पुढील सुनावणी यांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्व १२ संचालक पुढील बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागले आहे.

समविचारी आघाडीच्या समांतर सभेत शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब

पहिली सभा कोरमअभावी तहकूब झाल्यानंतर समविचारी आघाडीच्या संचालकांनी समांतर सभा घेतली होती. या सभेत गोकुळच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे आघाडीकडून सांगण्यात आले.

समविचारी आघाडीने ही निवड कायदेशीर असल्याचा दावा केला आहे. मात्र, आवश्यक कोरम पूर्ण नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगले यांनी या निवडीला मान्यता दिलेली नाही.

आता गोकुळच्या अध्यक्षपदाचा तिढा न्यायालयीन प्रक्रियेतून सुटणार की पुढील बैठकीत महायुतीचे संचालक उपस्थित राहिल्यानंतर अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा होणार, हे सोमवारी होणाऱ्या सुनावणीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष न्यायालयीन निर्णयाकडे लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button