सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाची तयारी; ४२ तास त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ३१ ऑक्टोबरला रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ येथे सोहळा; सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाचा निर्णय

नाशिक : दर १२ वर्षांनी भरणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता वेग आला आहे. आगामी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या सोहळ्याची सुरुवात ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ध्वजारोहण आणि ध्वजस्तंभ पूजनाने होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
४२ तास मंदिराचे दर्शन बंद
राष्ट्रपतींसह अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर येणार असल्याने मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन, कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर जवळपास ४२ तास सर्वसामान्य भाविकांसाठी बंद राहणार आहे.
या कालावधीत केवळ त्र्यंबकेश्वरमधील स्थानिक रहिवासी आणि जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत पास मिळालेल्या व्यक्तींनाच मंदिरात दर्शन घेता येणार आहे. इतर भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
पोलीस अधीक्षक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि देवस्थान ट्रस्टच्या सचिवांच्या अभिप्रायानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था प्रभावी ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.
हेही वाचा – रामलीला मैदानावरील काँग्रेसची सभा पुढे ढकला; औषध व्यापाऱ्यांसह १२ बाजार संघटनांची राहुल गांधींकडे मागणी
रामकुंडावर दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण
२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकमधील रामकुंड येथे दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.
त्यानंतर दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ (राम तीर्थ) येथे ध्वजस्तंभ पूजन करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील अन्य मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. राष्ट्रपतींचा दौरा, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीने या ध्वजारोहण आणि ध्वजस्तंभ पूजन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.




