आंतरराष्ट्रीय अनुभव, जागतिक दर्जाचे कौशल्य महत्त्वाचे – डॉ. गोविंद कुलकर्णी
‘जपान ची ओळख २०२६’ या उपक्रमाचे पीसीसीओई मध्ये यशस्वी आयोजन

पिंपरी, पुणे : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आंतरराष्ट्रीय अनुभव, शिक्षण आणि जागतिक दर्जाचे कौशल्य महत्त्वाचे आहे. जपान सारख्या प्रगत देशात देखील उद्योग खूप संधी आहेत. भारत आणि जपान यांच्यातील शैक्षणिक, औद्योगिक व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणे आणि जपान मधील उच्च शिक्षण, संशोधन, उद्योग, व्यवसाय संधी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जपानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे आयोजित केलेला ‘जपान ची ओळख २०२६’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी जेट्रो मुंबईचे महासंचालक हिसाशी मुराकामी, सहाय्यक संचालक नीलम भाटिया यांनी जपान मधील करिअरच्या विविध संधी तसेच भारतीय प्रतिभेला जपानी उद्योगांशी जोडण्यासाठी जेट्रो तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच नोव्हेंबर २०२६ मध्ये पीसीसीओई येथे जपानी उद्योग विषयक विशेष परिसंवाद आयोजित करण्याची घोषणाही करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना जपानी उद्योग विश्वाशी संवाद साधण्यासाठी आणखी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
पीसीसीओई च्या आंतरराष्ट्रीय संबंध विभाग आणि जपान सुविधा केंद्र यांच्या पुढाकारातून ‘जपान ची ओळख २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील ५५० हून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात जपानची शिक्षण पद्धती, जपानी भाषा, औद्योगिक संस्कृती, तंत्रज्ञानातील प्रगती, रोजगाराच्या संधी आणि जागतिक स्तरावरील करिअरचे पर्याय याची माहिती देण्यात आली. तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यावसायिक वातावरणाची प्रत्यक्ष ओळख करून घेता आली.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – गोकुळ अध्यक्ष निवडीचा तिढा हायकोर्टात; महायुतीचे १२ संचालक पुढील बैठकीला उपस्थित राहणार?

जपान फाउंडेशन, नवी दिल्लीच्या पश्चिम विभागातील जपानी भाषा शिक्षणाचे वरिष्ठ सल्लागार मकोतो सायतो, ॲस्टेमो एफआयई प्रा. लि.चे संचालक सुधीर गोगटे, जलताप, पुणे या संस्थेचे संस्थापक सदस्य डॉ. हरी दामले, डीजी फ्युचरटेक इंडिया प्रा. लि., पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम कुलकर्णी, जपानी करिअर समुपदेशक व व्यावसायिक सल्लागार राजेंद्र जोशी, फिडेल सॉफ्टटेक लि.च्या उच्च तंत्रज्ञान उपाययोजना विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष दीपक जोशी यांनी देखील मार्गदर्शन केले व माहिती दिली. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवाद साधता आला, नव्या संकल्पना समजून घेता आल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक व औद्योगिक संधी बाबत मार्गदर्शन मिळाले.
स्वागत करताना पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविण्याचा पीसीसीओई चा प्रयत्न आहे. येथे सातत्याने नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, उद्योग प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्राधान्य दिले जाते. ‘जपान ची ओळख’ सारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना जागतिक उद्योग विश्वाच्या गरजा, आंतर सांस्कृतिक संवाद, आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक बळकट होऊन विद्यार्थ्यांच्या जागतिक स्पर्धात्मक क्षमता विकसित करण्यास चालना मिळते. आभार पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील यांनी मानले. उपस्थितांनी विविध प्रदर्शने व स्टॉल्सना भेट देऊन संवाद साधला.




