“आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार”; खरगेंच्या विधानाला मोदींचे प्रत्युत्तर
विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप; पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता वितरित, ९.३४ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

बसानकांठा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वादग्रस्त विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहणार आहे,” असे मोदी यांनी म्हटले. विरोधकांकडून सातत्याने अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गुजरातमधील बसानकांठा जिल्ह्यातील भिलडी येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. तसेच भारत बोवाइन ब्रीडिंग अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन आणि सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व पायाभरणीही करण्यात आली.
खरगेंच्या विधानावर मोदींचा पलटवार
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी २५ ऑक्टोबर रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे आयोजित कार्यक्रमात भाषण केले होते. बिहारचे पहिले मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिंह यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने “मोदी कुठेच जाणार नाहीत,” असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना खरगे यांनी “मोदींचा बापदेखील जाईल,” असे विधान केल्याचे वृत्त आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.
यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जनतेची सेवा करत राहणार असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा – FDA Action : कालबाह्य अन्नपदार्थांची पुन्हा विक्री केल्यास कारवाई; महाराष्ट्रासाठी FDAचा स्वतंत्र आदेश
विरोधकांकडून अफवा पसरवल्याचा आरोप
विरोधी पक्षांवर टीका करताना मोदी म्हणाले की, काही लोकांना देश अडचणीत असताना आनंद होतो. इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी खतांचा तुटवडा निर्माण होईल आणि एलपीजी उपलब्ध होणार नाही, अशा अफवा पसरवल्याचा आरोप त्यांनी केला.
मोदी यांच्या मते, देशात भीतीचे वातावरण निर्माण करून त्यांची प्रतिमा खराब करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. मात्र, सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी कल्याणाला सरकारचे प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने शेतकरी कल्याणाला नेहमीच प्राधान्य दिल्याचा दावा केला. जागतिक अनिश्चिततेमुळे खतांच्या किमती वाढल्या असल्या, तरी त्याचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडू दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशातील छोट्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे ४.५ लाख कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहितीही मोदी यांनी दिली.
पीएम किसानचा २४ वा हप्ता वितरित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता वितरित करण्यात आला. या हप्त्याअंतर्गत देशातील ९.३४ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार आहेत.
या हप्त्यासाठी केंद्र सरकारकडून एकूण १८ हजार ६९० कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत. या निधीमुळे देशातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे.




