Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

AI आणि डिजिटल तंत्रज्ञानातून शासकीय कामकाजात पारदर्शकता वाढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

‘महाडीबीटी २.०’, ‘आपले सरकार २.०’, ‘मैत्री’ पोर्टलवरील नवीन सेवा आणि ‘महा-इंडस’ AI प्लॅटफॉर्मचा शुभारंभ; योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावी होणार

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरातून शासकीय कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासह अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी आणि योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महासारथी पोर्टलचा आढावा घेण्यात आला. यावेळी ‘महाडीबीटी २.०’, ‘आपले सरकार २.०’, ‘मैत्री’ पोर्टलवरील नवीन सेवा आणि ‘महा-इंडस’ या सुरक्षित AI प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला. या बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

AI आणि एकात्मिक डेटाबेसमुळे प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी

शासकीय कामकाजासाठी एकात्मिक डेटाबेस, AI तंत्रज्ञान आणि विविध विभागांतील माहितीचे एकत्रीकरण करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. ‘महा आयडी’च्या माध्यमातून नागरिकांची माहिती एकत्रित करण्याबरोबरच शासकीय यंत्रणेची कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढविण्यास मदत होणार आहे.

शासन निर्णयांच्या मोठ्या संग्रहातून आवश्यक माहिती त्वरित शोधणे, पत्रव्यवहाराचे व्यवस्थापन करणे आणि कार्यालयीन कामकाज सुलभ करणे यासाठी या डिजिटल प्रणालींचा उपयोग होणार आहे. सार्वभौम AI चा अशा प्रकारे वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

हेही वाचा –  जनजातीय गौरव दिन सप्ताह प्रभावीपणे राबवा; आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांचे निर्देश

योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावी होणार

‘महासारथी’ हा राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम पूर्णत्वाकडे जात असून, विविध विभागांशी संबंधित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. या प्रणालीमध्ये विविध विभागांच्या माहितीचे API Integration केल्यास डेटाचे नियमित अद्ययावतीकरण करणे शक्य होणार आहे.

यामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी, निधीचा विनियोग आणि लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येईल. विशेषतः वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांची निवड, अपात्र लाभार्थ्यांची ओळख आणि योजनांमुळे साध्य झालेल्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी एकत्रित माहितीचा उपयोग होणार आहे.

‘महा-इंडस’ AI प्लॅटफॉर्ममुळे प्रशासकीय कामकाज सुलभ

‘सर्वम एआय’च्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या ‘महा-इंडस’ या सुरक्षित AI प्लॅटफॉर्मचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मराठीसह २२ भारतीय भाषांमध्ये मसुदालेखन, भाषांतर, सारांश तयार करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे शक्य होणार आहे.

शासकीय डेटा देशाबाहेर जाणार नाही किंवा AI मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी वापरला जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवरील ‘जीआर एक्सपर्ट’ सुविधेद्वारे शासन निर्णय शोधणे व त्यांतील बदल तपासणे, ‘ई-मेल समरायझर’द्वारे ई-मेलचा सारांश तयार करणे आणि ‘आरएफपी बिड इव्हॅल्युएटर’च्या माध्यमातून निविदांची तुलना व मूल्यांकन करणे शक्य होणार आहे.

डिजिटल प्रणालींचा प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर भर

‘महाडीबीटी’, ‘आपले सरकार २.०’ आणि ‘मैत्री २.०’ या डिजिटल उपक्रमांचा केवळ विकास करून चालणार नाही, तर संबंधित विभागांनी त्यांचा प्रत्यक्ष वापर सुरू करणे आणि अधिकाधिक वापरकर्त्यांना या प्रणालींशी जोडणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. वापर वाढल्याने प्रणालींमधील त्रुटी आणि अडचणी ओळखून त्यावर वेळेत उपाययोजना करता येतील.

‘महा आयडी’चे सॉफ्ट लॉन्च करण्यात आले असून, आतापर्यंत एक कोटीहून अधिक आयडी तयार झाले आहेत. सर्व विभागांचे बॅकएंड इंटिग्रेशन पूर्ण झाल्यानंतर ही प्रणाली अधिक व्यापक स्वरूपात कार्यान्वित करता येणार आहे. प्रत्येक विभागाने निर्धारित वेळेत आपली जबाबदारी पूर्ण करून पुढील टप्प्याचे नियोजन काटेकोरपणे राबवावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले.

महाडीबीटी, आपले सरकार आणि मैत्री पोर्टलवर नवीन सेवा

‘महाडीबीटी २.०’वर मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४, कामगार विभागाच्या १० आणि महिला व बालविकास विभागाच्या दोन अशा एकूण ३६ नवीन योजनांचा शुभारंभ करण्यात आला.

‘आपले सरकार २.०’ पोर्टलवर परिवहन विभागाच्या ६१ सेवांसह विविध विभागांच्या एकूण ७१ सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच ‘मैत्री’ पोर्टलवर वैधमापनशास्त्र विभागाच्या १३ नवीन सेवांचा समावेश करण्यात आला आहे. या डिजिटल सेवांमुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button