Big News । शिरगावच्या साईबाबा ट्रस्टमध्ये कोट्यवधींच्या अपहाराचा आरोप
दानपेटीतील देणग्या, दुकानभाडे आणि ट्रस्टच्या ठरावांची चौकशी करा, उस्मान शेख यांची मागणी

– कारवाई न झाल्यास १५ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन व उपोषणाचा इशारा
पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील शिरगाव येथील श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि संलग्न श्री साईबाबा अन्नछत्र मंडळाच्या आर्थिक व्यवहारांत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप ट्रस्टचे संस्थापक व तहयात विश्वस्त उस्मान दगडू शेख यांनी केला. दानपेटीतील देणग्यांची अफरातफर, बनावट ठराव आणि कागदपत्रांतील फेरफार यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गुरुवारी पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत केली. कारवाई न झाल्यास १५ डिसेंबरपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आणि उपोषण सुरू करण्याचा इशारा तहयात विश्वस्त समीर शेख यांनी दिला.
ट्रस्टची नोंदणी ९ सप्टेंबर २००२ रोजी पुण्यात झाली असून, त्याचा नोंदणी क्रमांक इ/३६७४/पुणे असा आहे, असे समीर शेख यांनी सांगितले. ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या निधनानंतर रवी जाधव आणि उमेश कविटकर यांची नावे विश्वस्त म्हणून नोंदविण्यात आली. त्यानंतर इतर विश्वस्तांना विश्वासात न घेता आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप शेख यांनी केला.
हेही वाचा – कामशेतच्या पॅराग्लायडिंगला दिलासा, वीजवाहिनीचा मार्ग बदलण्याचे आदेश
देणग्या आणि बँक नोंदींची पडताळणी करण्याची मागणी
मंदिरात भाविकांकडून दरमहा लाखो रुपयांच्या रोख देणग्यांसह मौल्यवान वस्तू जमा होतात. दानपेटीतील रोख रकमेपैकी काही भागच संस्थेच्या बँक खात्यात जमा केला जात असल्याचा संशय समीर शेख यांनी व्यक्त केला. बँकेत भरलेल्या रकमेतील नोटांचा तपशील दानपेटीच्या नोंदींशी जुळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. दानपेटी उघडण्याच्या नोंदी, नोटांचा तपशील, बँक खात्यातील जमा रक्कम आणि संस्थेला मिळणारे दुकानभाडे यांची पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक पोलीस आणि पुण्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे यापूर्वी लेखी तक्रारी दिल्या होत्या. मात्र, त्यांची दखल घेण्यात आली नसल्याचा दावा शेख यांनी केला. दोन्ही कार्यालयांतील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अन्नछत्रातील सांडपाण्याचाही मुद्दा
अन्नछत्रातील सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. मंदिरात जमा होणाऱ्या निधीचा वापर गावातील विकासकामांसाठी करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. आर्थिक गैरव्यवहार आणि सांडपाण्याबाबतच्या तक्रारींची चौकशी करून फौजदारी कारवाई करावी, अन्यथा उर्वरित विश्वस्त आणि ग्रामस्थ आंदोलनात सहभागी होतील, असे समीर शेख यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला ॲड. अनघा कुलकर्णी, अक्षय धावरे, रामभाऊ गोपाळे आणि शिरगावचे ग्रामस्थ उपस्थित होते. या आरोपांवर रवी जाधव, उमेश कविटकर किंवा संबंधित प्रशासनाची प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.




