Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जनजातीय गौरव दिन सप्ताह प्रभावीपणे राबवा; आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांचे निर्देश

११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन; आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर

मुंबई : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणारा जनजातीय गौरव दिन सप्ताह प्रभावीपणे राबवावा. या माध्यमातून आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आदिवासी जननायकांच्या कार्याचा गौरव आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

सप्ताहाच्या नियोजनासंदर्भात शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्यासह नाशिक, ठाणे, नागपूर आणि अमरावती विभागांचे अपर आयुक्त तसेच विविध जिल्ह्यांचे प्रकल्प अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यावर भर देण्यात आला.

हेही वाचा –  सिल्लोड, सोयगावच्या पाणीपुरवठा योजनांना गती देण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार सविस्तर कार्यक्रम आराखडा तयार करावा. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमांचे नियोजन करावे. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या समन्वयाने पत्रकार परिषदा आयोजित कराव्यात, तसेच मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांद्वारे उपक्रमांची व्यापक प्रसिद्धी करावी, अशा सूचनाही डॉ. वुईके यांनी दिल्या.

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, न्यूक्लिअस बजेट आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकांची व पुतळ्यांची स्वच्छता, अभिवादन कार्यक्रम, शोभायात्रा आणि दीपोत्सव यांसारख्या उपक्रमांतून आदिवासी जननायकांचे योगदान जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

वनहक्कधारकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करणे, आरोग्य तपासणी आणि जनजागृती उपक्रम राबविणे, तसेच कातकरी, कोलाम, माडिया आणि पारधी या आदिवासी समूहांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या. जात प्रमाणपत्र, आधार नोंदणी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावरही भर देण्यात आला.

आदिवासी विकास विभाग आणि शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे अनुभव समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करून योजनांची परिणामकारकता जनतेपर्यंत पोहोचवावी, असे निर्देशही आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button