महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत विशेष व्यवस्था; अण्णा बनसोडे यांचे प्रशासनाला निर्देश
६ डिसेंबरला चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे, बस, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन; मुंबई महापालिकेकडून २५ ते ३० कोटींच्या निधीची तरतूद अपेक्षित

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क परिसरासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या आणि स्मारकांच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी CCTV यंत्रणा आणि ड्रोनचा वापर करावा. तसेच, वाहतुकीतील बदलांची माहिती नागरिकांना आगाऊ देऊन आवश्यक नियोजन करावे, असे बनसोडे यांनी सांगितले.
रेल्वे आणि बससेवेचे विशेष नियोजन
दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनुयायांच्या सोयीसाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडाव्यात आणि ६ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक टाळण्याबाबत रेल्वे प्रशासनाने विचार करावा, अशी सूचना करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही अतिरिक्त बससेवेचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.
हेही वाचा – AI आणि डिजिटल तंत्रज्ञानातून शासकीय कामकाजात पारदर्शकता वाढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेवर भर
सार्वजनिक आरोग्य विभागाने ५ आणि ६ डिसेंबर रोजी वैद्यकीय तपासणी, आरोग्य जनजागृती आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
६ डिसेंबर रोजी राज्यात ‘ड्राय डे’ घोषित करण्याबाबत तसेच सार्वजनिक सुट्टीसंदर्भातील परिपत्रक आगाऊ प्रसिद्ध करण्याबाबत संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, असेही बैठकीत सुचविण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार
सामाजिक न्याय विभागाने वृत्तपत्रांमधून विशेष जाहिराती प्रसिद्ध करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करावा. शिवाजी पार्क परिसरात पुस्तकांचे स्टॉल उभारून विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती अनुयायांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश देण्यात आले.
मुंबई महापालिकेकडून निधीची तरतूद
महापरिनिर्वाण दिनाच्या व्यवस्थेसाठी अंदाजे २५ ते ३० कोटी रुपयांचा निधी आवश्यक ठरू शकतो. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेने आवश्यक निधीची तरतूद आणि प्रशासकीय मंजुरीसंदर्भातील कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, अशी सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केली.
या बैठकीस गृह विभाग, सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




