Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

नाशिकच्या गोदाकाठी ५१७ जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ऐतिहासिक नोंद!

अमेरिकेचा ३०३ जणांचा विक्रम मोडला; सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या स्वागतासाठी गोदावरीच्या तीरावर भारतीय संस्कृतीचा जागर

नाशिक : गोदावरीच्या पवित्र तीरावर ५१७ व्यक्तींनी एकाच वेळी शंखनाद करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी विक्रमाची घोषणा करताच परिसर ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. अमेरिकेतील ३०३ व्यक्तींच्या सामूहिक शंखनादाचा पूर्वीचा विक्रम मागे टाकत नाशिकने ऐतिहासिक कामगिरी केली. भक्ती, श्रद्धा, सामूहिक एकजूट आणि भारतीय संस्कृतीचा गौरव अधोरेखित करणारा हा सोहळा आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या स्वागताची आध्यात्मिक नांदी ठरला.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर यशवंत महाराज पटांगण, गोदाकाठ येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात एकाच वेळी घुमलेल्या शंखध्वनीने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमातून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला.

यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नियोजन विभागाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग, समन्वयक मिलिंद बेर्लेकर, अनंत विजय शंखनाद पथकाच्या वृषाली घोलप आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह साधू-महंत, शंखनाद वादक आणि नागरिक उपस्थित होते.

नाशिकच्या कामगिरीने महाराष्ट्राच्या लौकिकात भर

विश्वविक्रमाची घोषणा झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन केले. हा उपक्रम केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, देशाच्या लौकिकात भर घालणारा आहे. अशा उपक्रमांमधून भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सामूहिक सहभागाची ताकद जगासमोर येते, असे त्यांनी सांगितले.

शंखनाद हा भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मंगलकार्य, धार्मिक विधी आणि आध्यात्मिक उपासनेत शंखनादाला विशेष महत्त्व आहे. या परंपरेला विश्वविक्रमाची जोड देण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये यशस्वी झाला. शेकडो नागरिकांनी एकाच वेळी शंखनाद करण्यासाठी दाखवलेली तयारी, शिस्त आणि उत्साह ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये ठरली.

हेही वाचा –  विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी कशी होते? पसंतीक्रम, मतांचे हस्तांतरण आणि विजयाचा कोटा समजून घ्या!

निर्धारित निकषांनुसार विक्रमाची पडताळणी

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी विश्वविक्रम नोंदविण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. यापूर्वी एकाच वेळी ३०३ व्यक्तींनी शंखनाद करण्याचा विक्रम नोंदवला होता. तो मोडण्यासाठी निर्धारित निकषांनुसार त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकाच वेळी शंखनाद करणे आवश्यक होते. या उपक्रमासाठी ५०० हून अधिक जणांनी नोंदणी केली होती. सहभागींच्या नोंदी, प्रत्यक्ष सहभाग आणि नियमांनुसार केलेल्या कामगिरीची दोन निरीक्षकांकडून पडताळणी करण्यात आली.

शंख वाजविण्यासाठी श्वसनावर नियंत्रण, नियमित सराव आणि शारीरिक क्षमता आवश्यक असते. त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागींचा समन्वय साधून सामूहिक शंखनाद करणे हे आव्हानात्मक होते. नाशिककरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकजुटीचे दर्शन घडवले. या सामूहिक प्रयत्नांमुळे शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी प्रतिष्ठा मिळाली.

सिंहस्थ कुंभमेळा प्रत्येक नाशिककराचा सोहळा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री महाजन यांनी नागरिकांना तयारीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ शासनाचा, प्रशासनाचा, लोकप्रतिनिधींचा किंवा पोलिसांचा कार्यक्रम नसून प्रत्येक नाशिककराचा सोहळा आहे. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे ज्या आपुलकीने स्वागत केले जाते, त्याच भावनेने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा सन्मान केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

आगामी कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रस्ते, घाट, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, वाहतूक, निवास, भोजन आणि भाविकांना मार्गदर्शन अशा विविध बाबींचे नियोजन महत्त्वाचे आहे. प्रशासन पायाभूत सुविधा उभारण्याच्या कामात कार्यरत असून, नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, स्वयंसेवक आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना योग्य माहिती मिळावी, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि नाशिकमधील वास्तव्य सुखकर व्हावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाशिकची स्वच्छता, सुंदरता आणि नागरिकांचे प्रेमळ आदरातिथ्य भाविकांच्या स्मरणात राहावे, हीच या सोहळ्याच्या यशाची खरी कसोटी असेल, असेही महाजन यांनी नमूद केले.

३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण; सिंहस्थ पर्वाच्या तयारीला गती

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकमधील रामकुंडावर दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथेही त्याच वेळी ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री महाजन यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button