राज्यात सात लाख नवसाक्षरांची परीक्षा; उत्तीर्णांना केंद्र सरकारचे प्रमाणपत्र, पुढील शिक्षणाचीही संधी!
‘उल्लास नव भारत साक्षरता’ अभियानांतर्गत एफएलएनएटी चाचणी यशस्वी; नवसाक्षरांना तिसरी ते बारावीच्या परीक्षांना बसता येणार

मुंबई : राज्यभरात केंद्र पुरस्कृत ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) यशस्वीरीत्या घेण्यात आली. या परीक्षेत सुमारे सात लाख परीक्षार्थी सहभागी झाले. या चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून प्रमाणपत्र आणि गुणपत्रक देण्यात येणार आहे. तसेच त्यांना पुढील शिक्षणासाठी इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी दिली.
नऊ माध्यमांतून परीक्षा
असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. उल्लास ॲपवर नोंदणी केलेल्या परीक्षार्थ्यांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील यू-डायस प्राप्त शाळांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि बंगाली अशा नऊ माध्यमांतून परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून नवसाक्षरांच्या पायाभूत वाचन, लेखन आणि संख्याज्ञान कौशल्यांचे मूल्यमापन करण्यात आले.
जीवनकौशल्यांच्या विकासाला चालना
या चाचणीमुळे केवळ वाचन-लेखन आणि गणितीय कौशल्यांचे मूल्यमापन होणार नाही, तर नवसाक्षरांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली विविध कौशल्ये विकसित करण्यासही मदत होणार आहे. आर्थिक व कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्यविषयक जागरूकता, बालसंगोपन, शिक्षण आणि कुटुंबकल्याणाशी संबंधित जीवनकौशल्यांना या कार्यक्रमात महत्त्व देण्यात आले आहे.
हेही वाचा – नाशिकच्या गोदाकाठी ५१७ जणांचा सामूहिक शंखनाद; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ऐतिहासिक नोंद!
शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजीत सिंह देओल आणि आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
परीक्षेदरम्यान जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. जिल्हास्तरीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनीही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
शिक्षक संघटना, शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी परीक्षेचे नियोजन करून ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. या उपक्रमामुळे असाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास आणि त्यांच्यासाठी पुढील शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.




