Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

गँगस्टर हिमांशू भाऊला अमेरिकेत अटक! एनआयए आणि एफबीआयची संयुक्त कारवाई

नवी दिल्ली | भारतातील केंद्रीय तपास यंत्रणांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे यश मिळाले आहे. दिल्ली आणि हरयाणा पोलिसांना गुंगारा देणारा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू ऊर्फ हिमांशू भाऊ याला अमेरिकेतील कायदा अंमलबजावणी संस्थांनी लास वेगास येथून अटक केली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या अचूक इनपुट्स आणि लोकेशनच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान, जामिनावर असताना पायातील ‘अँकल ब्रेसलेट ट्रॅकर’ काढून पसार झालेला आणखी एक फरार गुन्हेगार नीरज फरीदपुरिया यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) सूत्रांनुसार, हिमांशूविरुद्ध ऑगस्ट २०२३ मध्ये इंटरपोलने ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी केली होती. दिल्ली आणि हरयाणा पोलिसांची विशेष पथके दीर्घकाळापासून त्याचा मागोवा घेत होती. तांत्रिक पाळत आणि गुप्त माहितीच्या आधारे लास वेगासमधील त्याचे नेमके ठिकाण शोधण्यात आले. भारतीय यंत्रणांनी हे जीपीएस कोऑर्डिनेट्स अमेरिकन तपास यंत्रणांना पुरवले, ज्यानंतर गुरुवारी संध्याकाळी सापळा रचून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. आता या दोन्ही कुख्यात गुन्हेगारांच्या जलद प्रत्यार्पणासाठी (Extradition) भारतीय यंत्रणा अमेरिकन प्रशासनाशी समन्वय साधत असून, कायदेशीर पूर्ततेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक अमेरिकेला रवाना होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सचा नवा मुख्य प्रशिक्षक; MI कडून मोठी घोषणा

कोण आहे हिमांशू भाऊ?

हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील रितोली गावातील रहिवासी असलेला २३ वर्षीय हिमांशू ऊर्फ कुणाल याने रोहतकच्या भाजी मंडईतून व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळण्यास सुरुवात केली होती. रितोली येथील सनी नावाच्या तरुणाच्या हत्या प्रकरणात त्याला पकडण्यात आले होते; मात्र २०२० मध्ये तो हिसार येथील बालसुधारगृहातून पळून जाण्यात यशस्वी झाला. बालसुधारगृहातून पळाल्यानंतर तो गँगस्टर नीरज बवाना आणि इतर स्थानिक गुंडांच्या संपर्कात आला आणि त्याने स्वतःची गुन्हेगारी टोळी तयार केली. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे ३० हून अधिक गुन्हे दाखल असून, त्यातील किमान १६ गुन्हे हत्येशी संबंधित आहेत.

बनावट पासपोर्टच्या आधारे देशाबाहेर पलायन

आपल्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी होण्यापूर्वीच, हिमांशूने ऑगस्ट २०२२ मध्ये उत्तर प्रदेशातील बरेली येथून ‘कुणाल सिंग’ या बनावट नावाने पासपोर्ट मिळवला होता. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने भारतातून पळ काढला आणि परदेशात बसूनच हरयाणा व दिल्लीतील गुन्हेगारी कारवाया चालवत होता. मात्र, आंतरराष्ट्रीय सहकार्यामुळे अखेर अमेरिकेत त्याचा खेळ संपला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button