दिवाळीच्या काळात काँग्रेसची महारॅली नको! व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; ₹१० हजार कोटींच्या नुकसानीची भीती
१ नोव्हेंबरचे आंदोलन १० नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी; दिवाळीच्या खरेदीतून दिल्लीत ₹२५ हजार कोटींच्या व्यापाराची अपेक्षा

नवी दिल्ली : दिवाळीच्या सणासुदीच्या काळात होणाऱ्या संभाव्य व्यावसायिक नुकसानीबाबत दिल्लीतील व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेसने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली आयोजित केल्याच्या पार्श्वभूमीवर, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) या व्यापारी संघटनेने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. सणासुदीचा महत्त्वाचा व्यापारकाळ लक्षात घेऊन ही महारॅली १० नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
CTI चे अध्यक्ष बृजेश गोयल यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात दिवाळीच्या काळात व्यापाऱ्यांसाठी असलेल्या व्यावसायिक संधींचा उल्लेख केला आहे. धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीज या सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. त्यामुळे या कालावधीत आंदोलन झाल्यास बाजारपेठांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे.
दिवाळीत २५ हजार कोटींच्या व्यापाराची अपेक्षा
CTI च्या पत्रानुसार, यंदा धनत्रयोदशी ६ नोव्हेंबर, दिवाळी ८ नोव्हेंबर आणि भाऊबीज १० नोव्हेंबर रोजी आहे. ग्राहक दिवाळीच्या साधारण आठवडाभर आधीपासूनच खरेदीला सुरुवात करतात. सोने-चांदी, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, सुका मेवा, मिठाई, वाहने आणि घरखरेदीसह विविध क्षेत्रांत मोठी उलाढाल होते.
या सणासुदीच्या कालावधीत दिल्लीमध्ये सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा व्यापार होण्याची अपेक्षा असल्याचा दावा CTI ने केला आहे. दिल्लीच्या अर्थव्यवस्थेसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असल्याने महारॅलीची तारीख पुढे ढकलावी, असे आवाहन संघटनेने केले आहे.
हेही वाचा – प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात आरोपींवर मोक्काची टांगती तलवार; ठाणे SIT कडून मोठ्या कारवाईची तयारी
आंदोलनांमुळे तीन हजार कोटींच्या नुकसानीचा दावा
CTI च्या दाव्यानुसार, यापूर्वी कॅनॉट प्लेस, इंडिया गेट आणि मध्य दिल्ली परिसरात झालेल्या आंदोलनांमुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. या आंदोलनांमुळे सुरुवातीच्या टप्प्यातच सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. वाहतुकीतील अडथळ्यांमुळे बाजारपेठांमध्ये माल पोहोचवणे कठीण झाले, तर ग्राहकांची वर्दळही कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
रामलीला मैदानाच्या पाच किलोमीटर परिसरात मोठ्या बाजारपेठा
बृजेश गोयल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रामलीला मैदानाच्या सुमारे पाच किलोमीटर परिसरातील प्रमुख घाऊक आणि किरकोळ बाजारपेठांचा उल्लेख करण्यात आला आहे. चांदणी चौक, सदर बाजार, चावडी बाजार, भागीरथ पॅलेस, खारी बावली, काश्मिरी गेट, नया बाजार, मोरी गेट, किनारी बाजार, दरीबा, दरियागंज, अजमेरी गेट, जामा मशीद, झंडेवालान, करोल बाग, नबी करीम, आझाद मार्केट आणि लजपत राय मार्केट या बाजारपेठांचा त्यात समावेश आहे. या बाजारपेठांमधून देशभरात मालाचा पुरवठा केला जातो.
आगामी सणासुदीच्या काळात पुन्हा आंदोलन झाल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान आणखी वाढू शकते आणि नुकसानीचा आकडा दहा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, अशी भीती CTI ने व्यक्त केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे हित आणि दिवाळीच्या व्यापाराचा विचार करून काँग्रेसने महारॅली पुढे ढकलावी, अशी मागणी संघटनेने राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.




