मुदतबाह्य अन्नपदार्थांच्या संशयित विक्रीवर FDAची मोठी कारवाई! रिलायन्स, झोमॅटो हायपरप्युअर आणि ब्लिंकिटशी संबंधित गोदामांचे ५ परवाने निलंबित
भिवंडी, अंबरनाथ, चाकण आणि निघोजे येथे तपासणी; ८,३९२ किलो अन्नसाठ्यासह ४८.०९ लाखांचा माल आढळला, विनापरवाना आस्थापनांचे कामकाज बंद करण्याचे निर्देश

मुंबई : मुदतबाह्य, खराब आणि पॅकेजिंगचे नुकसान झालेल्या अन्नपदार्थांची योग्य विल्हेवाट न लावता ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी आणले जात असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यात मोठी कारवाई केली आहे. भिवंडी, अंबरनाथ तसेच पुणे जिल्ह्यातील चाकण आणि निघोजे येथे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, झोमॅटो हायपरप्युअर आणि ब्लिंकिटशी संबंधित गोदामांचे पाच अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
या मोहिमेदरम्यान एकूण ८,३९२ किलो अन्नसाठ्यासह ४८.०९ लाख रुपयांचा माल आढळला. याशिवाय, तीन आस्थापना आवश्यक अन्न परवान्याशिवाय व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे कामकाज थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ठाणे आणि पुणे जिल्ह्यांत एकाच वेळी तपासणी
मुदतबाह्य, खराब, नाकारलेली आणि पॅकेजिंगचे नुकसान झालेली उत्पादने अधिकृत विल्हेवाटीसाठी पाठवल्यानंतर ती प्रत्यक्षात नष्ट न करता दलाल आणि विनापरवाना विक्रेत्यांच्या माध्यमातून पुन्हा बाजारात आणली जात असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी ठाणे व पुणे जिल्ह्यांत सात पथकांनी एकाच वेळी तपासणी केली.
भिवंडीतील वाडपे येथे रिलायन्सच्या दोन गोदामांत, अंबरनाथमधील उसटणे येथे झोमॅटो हायपरप्युअरच्या गोदामात, तर पुणे जिल्ह्यातील चाकण आणि निघोजे येथे रिलायन्स रिटेल व ब्लिंकिटशी संबंधित गोदामांत तपासणी करण्यात आली. या ठिकाणी विविध त्रुटी आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
विल्हेवाटीच्या कागदपत्रांत विसंगती
तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या विल्हेवाटीसंबंधीच्या कागदपत्रांमध्ये अनेक विसंगती आढळल्या. काही नोंदींमध्ये माल पाठवणारी आणि स्वीकारणारी आस्थापना एकच असल्याचे दिसून आले. तसेच बॉक्स आणि किलो या मोजमापांमध्ये मालाच्या प्रमाणाबाबत तफावत आढळली. काही ठिकाणी वाहतूक आणि विल्हेवाट एकाच दिवशी झाल्याच्या नोंदी होत्या.
याशिवाय, मालाची अंतिम विल्हेवाट प्रत्यक्षात लावण्यात आल्याचे सिद्ध करणारे पडताळणीयोग्य पुरावे काही आस्थापनांकडून सादर करण्यात आले नसल्याचे तपासणीत समोर आले. या विसंगतींच्या पार्श्वभूमीवर संबंधित आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
भिवंडीतील दुकानात मुदतबाह्य अन्नपदार्थ
भिवंडीतील एका डिस्काउंट स्टोअरमध्ये ८० हजार ५७५ रुपयांचे मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. संबंधित दुकानाकडे वैध अन्न परवाना नव्हता. तसेच दुकानाला माल पुरवणाऱ्या चाविंद्रा येथील आस्थापनाकडेही आवश्यक परवाना नसल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कथित विल्हेवाट केंद्राचे कामकाज बंद करण्याचे निर्देश
भिवंडीतील बी. के. डिस्पोज या कथित विल्हेवाट केंद्रात विविध कंपन्यांचा माल विनापरवाना साठविल्याचे आढळले. मालाची वाहतूक, हस्तांतरण आणि प्रत्यक्ष विल्हेवाट सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे या आस्थापनालाही कामकाज बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची विल्हेवाट नियमांनुसार होते की नाही, यावर FDAने लक्ष केंद्रित केले आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्नपदार्थांच्या साठवणुकीपासून ते अंतिम विल्हेवाटीपर्यंतची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडणे आवश्यक आहे.




