रत्नागिरीत परतीच्या पावसाची हजेरी; चिपळूण-संगमेश्वरला दिलासा, भातशेतीवर मात्र संकटाचे सावट
उकाड्याने हैराण नागरिकांना गारवा; पीक कापणीच्या तोंडावर पाऊस आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली, जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा

रत्नागिरी : पावसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने उकाडा, पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशातच शनिवारी रात्री चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, भातपीक कापणीच्या उंबरठ्यावर असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
संगमेश्वरमध्ये जोरदार पाऊस
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव आणि परिसरात शनिवारी सायंकाळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अचानक कोसळलेल्या पावसामुळे जनजीवनाची तारांबळ उडाली.
भातपीक कापणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता
यंदा सुरुवातीपासूनच पावसाच्या अनियमिततेचा परिणाम शेतीवर झाला आहे. प्रतिकूल हवामानाचा सामना करत शेतकऱ्यांनी भातशेती फुलवली. आता पीक कापणीच्या उंबरठ्यावर असताना परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेले पीक धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
आधीच पावसाच्या कमतरतेमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असताना, आता परतीचा पाऊस भातपिकासाठी नुकसानकारक ठरणार की फायदेशीर, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. वर्षभराच्या कष्टाचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे.
हेही वाचा – ‘ईव्हीएमवर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला
चिपळूणमध्ये रात्री पावसाने दिलासा
चिपळूण परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. दीर्घकाळ पाऊस नसल्याने वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. अशा परिस्थितीत पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
मात्र, या पावसाचा भातपिकावर नेमका काय परिणाम होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पाऊस शेतीसाठी कितपत उपयुक्त ठरणार, हे पुढील हवामानावर आणि पावसाच्या तीव्रतेवर अवलंबून असेल.
जिल्ह्यातील अन्य तालुक्यांना प्रतीक्षा
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेतीचे नियोजनही विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याच्या उपलब्धतेची चिंता सतावत आहे.
चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांत पाऊस झाल्याने काही भागांना दिलासा मिळाला असला, तरी रत्नागिरीसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने काही ठिकाणी गारवा निर्माण केला असला, तरी पाणीटंचाई आणि शेतीसमोरील संकट अद्याप दूर झालेले नाही.




