महामार्ग रोकोचा कोल्हापूरला दुहेरी फटका! भाजीपाला महागला, शंभरहून अधिक एसटी बस रद्द; हजारो ट्रक अडकले
कोगनोळी टोलनाक्यावरील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र-कर्नाटक वाहतूक विस्कळीत; काही भाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालक, व्यापारी आणि प्रवाशांनाही बसू लागला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हजारो ट्रक आणि कंटेनर अडकून पडल्याने मालवाहतुकीवर परिणाम झाला असून, कोल्हापूरच्या भाजीपाला बाजारात आवक घटल्याने काही भाज्यांचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरहून बेळगावला जाणाऱ्या शंभरहून अधिक एसटी बस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे.
हजारो ट्रक-कंटेनर अडकले
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोगनोळी टोलनाक्यावर बेमुदत महामार्ग रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमेवर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.
कोल्हापुरातील लक्ष्मी टेकडी आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी परिसरात हजारो ट्रक आणि कंटेनर अडकून पडल्याचे चित्र आहे. या वाहनांमधून विविध राज्यांमध्ये मालाची वाहतूक केली जाते. मात्र, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने माल वेळेत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. वाहनचालक आणि क्लीनर यांनाही खाण्यापिण्यासह दैनंदिन गरजांसाठी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा – तुकाराम मुंढेंच्या FDA ची KFC वर मोठी कारवाई; अन्न परवाना निलंबित, त्रुटी दूर होईपर्यंत व्यवसाय बंद
भाजीपाल्याची आवक घटली; दरांत वाढ
महामार्ग रोकोचा परिणाम कोल्हापूरच्या भाजीपाला बाजारावरही झाला आहे. बेळगाव, गटप्रभा आणि परिसरातील विविध भागांतून कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. मात्र, सीमेवर वाहने अडकून पडल्याने भाजीपाला आणि इतर नाशवंत मालाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी, बाजारातील आवक घटून किरकोळ आणि घाऊक दरांमध्ये वाढ झाली आहे.
उपलब्ध दरांनुसार, भेंडीचे दर किलोमागे ८० रुपयांवरून १०० रुपये, ढबू मिरचीचे दर ७० वरून ८० रुपये, गाजराचे दर ६५ वरून ८० रुपये आणि वांग्याचे दर ८५ वरून १०० रुपये झाले आहेत. वाटाण्याचे दर १८० वरून २०० रुपये, तर बीन्सचे दर ९० वरून १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. हिरव्या मिरचीचे दरही ७० वरून ८० रुपये किलो झाले आहेत.
घाऊक बाजारातही दरवाढ दिसून येत आहे. फुलकोबीचा दर २०० रुपयांवरून ३५० रुपये, तर कोबीचा दर ६० रुपयांवरून १०० रुपये झाला आहे. कोथिंबिरीच्या एका जुडीचा दर १५ रुपयांवरून ३० रुपये झाला असून, १० किलो वांग्यांचा दर ५०० रुपयांवरून ६०० रुपयांपर्यंत वाढला आहे. वाहतूक आणखी किती काळ विस्कळीत राहते, यावर बाजारातील आवक आणि दरांची स्थिती अवलंबून राहणार आहे.
बेळगावकडे जाणाऱ्या शंभरहून अधिक एसटी बस रद्द
महामार्ग रोकोचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेलाही बसला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूरहून बेळगावला जाणाऱ्या शंभरहून अधिक एसटी बस मंगळवारपासून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामानिमित्त, प्रवासासाठी आणि अन्य कारणांसाठी बेळगावला जाण्यासाठी कोल्हापूर एसटी स्थानकात आलेल्या शेकडो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बेळगावच्या दिशेने बससेवा बंद असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्यांपर्यंत
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे आंतरराज्य वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. महामार्गावर अडकलेली वाहने, विस्कळीत झालेली मालवाहतूक, भाजीपाल्याच्या दरांत झालेली वाढ आणि एसटी बस रद्द झाल्याने प्रवासी अडचणीत आले आहेत. आंदोलनावर तोडगा निघून वाहतूक पूर्ववत कधी होणार, याकडे वाहनचालक, व्यापारी आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.




