गोकुळ संचालक नियुक्तीप्रकरणी सुनावणी ३ डिसेंबरला; सर्व १६ संचालकांना नोटीस बजावण्याचे आदेश!
समविचारी आघाडीला मूळ याचिकेत दुरुस्तीची परवानगी; अनुपस्थित संचालकांशिवायही सुनावणी सुरू ठेवण्याचे न्यायालयाचे संकेत

कोल्हापूर : गोकुळ दूध संघातील शासन नियुक्त चार संचालकांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता येत्या ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ही सुनावणी होणार आहे. शासन नियुक्त चार संचालकांसह महायुतीच्या १२ संचालकांनाही पुढील सुनावणीसाठी नोटीस बजावण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीच्या वकिलांनी केलेल्या विनंतीनंतर सुनावणीची पुढील तारीख निश्चित करण्यात आली.
याचिकेत दुरुस्ती करण्यास परवानगी
बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान समविचारी आघाडीने मूळ याचिकेत काही दुरुस्त्या करण्याची तसेच अध्यक्ष निवडीसह आतापर्यंत घडलेल्या घटनांची नोंद न्यायालयीन रेकॉर्डवर घेण्याची परवानगी मागितली. महायुतीच्या वकिलांनी या मागणीला आक्षेप घेतला. मात्र, समविचारी आघाडीची विनंती मान्य करत न्यायालयाने मूळ याचिकेत दुरुस्ती करण्यास परवानगी दिली. या प्रकरणातील आतापर्यंतच्या सर्व घडामोडी अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, काही संचालकांना अद्याप नोटीस मिळाली नसल्याचा दावा महायुतीच्या वकिलांनी केला. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत नोटीस मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यामागे सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल केला. त्यानंतर महायुतीचे १२ आणि शासन नियुक्त चार अशा सर्व १६ संचालकांना विविध माध्यमांतून नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. ही नोटीस गोकुळ प्रशासनामार्फत पाठविण्यात येणार आहे.
नोटीस बजावल्यानंतरही संबंधित संचालक सुनावणीस उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांच्या अनुपस्थितीत सुनावणी सुरू ठेवण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा – डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथे आंतरराष्ट्रीय पुरुष दिन उत्साहात साजरा
शासनाच्या चार संचालकांच्या नियुक्तीवरून वाद
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले होते. त्यामुळे अध्यक्षपद समविचारी आघाडीकडे जाण्याची शक्यता असताना राज्य शासनाने चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती केली. या संचालकांना मतदानाचा अधिकारही देण्यात आल्याने राजकीय वाद निर्माण झाला. या नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा अध्यक्ष गोकुळमध्ये निवडून आला.
शासनाच्या या निर्णयाला सतेज पाटील गटाने न्यायालयात आव्हान दिले. यापूर्वी न्यायालयाने शासन नियुक्त चार संचालकांचे मतदानाचे अधिकार कायम ठेवले होते; मात्र त्यांची मते स्वतंत्र मतपेटीत ठेवण्याचे निर्देश दिले होते. तसेच अध्यक्षपदाची निवडणूक न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील, असे स्पष्ट केले होते.
‘वकिलांच्या फीवर ८० लाखांची उधळपट्टी’
दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शासन नियुक्त चार संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी महायुतीने वकिलांच्या फीपोटी ८० लाख रुपये खर्च केल्याचा आरोप केला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना आणि शेतकरी अडचणीत असताना गोकुळमधील सत्तेसाठी एवढा खर्च कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा खर्च शासनाच्या तिजोरीतून करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला आहे. गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर होत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.




