Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

पोषणाचा संदेश घराघरांत; चांदिवली प्रकल्पात राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा

पौष्टिक आहार प्रदर्शन, मंगळागौर, पथनाट्य आणि विविध उपक्रमांतून कुपोषणमुक्त भारताचा जागर; अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा गौरव

मुंबई : ‘पोषणाचा अधिकार, सुदृढ भारताचा आधार’ या संकल्पनेतून एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), चांदिवली प्रकल्पांतर्गत असल्फा, नारायणनगर बीट क्रमांक ५ आणि नौपाडा बीट क्रमांक ६ येथे नववा राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा करण्यात आला. बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमातून पौष्टिक आहाराचे महत्त्व, कुपोषण प्रतिबंध, माता व बाल आरोग्य आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. पारंपरिक वेशभूषेत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. अंगणवाडी सेविका अश्विनी गांगरकर यांनी प्रास्ताविकात अंगणवाडी आणि बीट स्तरावर राबविण्यात आलेल्या पोषणविषयक उपक्रमांची माहिती दिली.

पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन

‘आपली अंगणवाडी, आपली जबाबदारी’ आणि ‘पौष्टिक भारत, सशक्त भारत’ या संकल्पनांवर आधारित पोषण आहार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी तयार केलेल्या पौष्टिक पाककृतींची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विविध भाज्या, कडधान्ये आणि फळांमधील पोषणमूल्यांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. आकर्षक रांगोळी, सजावट आणि घोषवाक्यांच्या माध्यमातूनही पोषणाचा संदेश देण्यात आला.

माता आणि बालकांचा सन्मान

मुलींच्या जन्माचे स्वागत, अन्नप्राशन, ओटीभरण आणि किशोरवयीन मुलींच्या वयात येण्याशी संबंधित कार्यक्रमांतर्गत बालके व मातांचे औक्षण करून त्यांचा गौरव करण्यात आला. बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद कुऱ्हाडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना भेटवस्तू आणि ‘पहिले १००० दिवस’ हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. घाटकोपर मुंबई डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ येवले यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

हेही वाचा –  सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार; विकासकामांना गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

मंगळागौर, पथनाट्यांतून जनजागृती

राष्ट्रीय पोषण माह अभियानांतर्गत असल्फा आणि नौपाडा येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रितपणे नावीन्यपूर्ण मंगळागौर सादर केली. नारायणनगर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेवर आधारित पथनाट्य सादर करून योजनेविषयी जनजागृती केली. किशोरी त्रिशा तांबे हिने नृत्य सादर केले.

तिरंग्याच्या वेशभूषेत घोषवाक्ये आणि नाटिकेच्या माध्यमातून पोषणविषयक विचार प्रभावीपणे मांडण्यात आले. नऊ दुर्गांच्या रूपातून पोषणयुक्त आहारातील विविध घटक आणि त्यांच्या पोषक तत्त्वांचे महत्त्व अधोरेखित करणारी अन्नपूर्णेची संकल्पना साकारण्यात आली. यावेळी पोषणगीतही सादर करण्यात आले. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

उत्कृष्ट अंगणवाडी सेविकांचा गौरव

कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शरद कुऱ्हाडे यांनी कुपोषणावर मात करणे हे सर्वांचे सामूहिक कर्तव्य असल्याचे सांगितले. अंगणवाडी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी जनसमुदायाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

मातागटांच्या बैठका, बालकांच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन आणि शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांनी सर्वांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका पद्मा मलवळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांदिवली प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मुख्यसेविका अक्षता कोरगावकर, लीना मांडेलकर, माधुरी लकडे, प्रिया मोरे आणि धनश्री कोडावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button