चांगला वकील होण्यासाठी आधी चांगला श्रोता व्हा; अॅड. डॉ. हेमंत चव्हाण
जी. एस. पाटील विधी महाविद्यालयात 'विधी आरंभ २०२६' उत्साहात संपन्न

पिंपरी- चिंचवड | एस.एस.पी. शिक्षण संस्थेच्या जी. एस. पाटील विधी महाविद्यालय, चिखली येथे एलएल.बी. प्रथम वर्ष (शैक्षणिक वर्ष २०२६-२७) विद्यार्थ्यांसाठी “विधी आरंभ २०२६” हा इंडक्शन (स्वागत व मार्गदर्शन) कार्यक्रम सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ व सायबर कायद्याचे तज्ज्ञ अॅड. डॉ. हेमंत बाजीराव चव्हाण उपस्थित होते. त्यांनी “क्लासरूम टू कोर्टरूम : लॉ इन द डिजिटल एज” (कक्षेपासून न्यायालयापर्यंत : डिजिटल युगातील कायदा) या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल व मार्गदर्शक विचार मांडले. विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना अॅड. चव्हाण म्हणाले, “भविष्यात एक यशस्वी व चांगला वकील व्हायचे असेल, तर सर्वात आधी एक चांगला श्रोता होणे अत्यंत गरजेचे आहे. डिजिटल युगात कायदे आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून अभ्यासू वृत्ती ठेवल्यास यश नक्कीच मिळते.”
हेही वाचा
CM फडणवीस ‘ON FIRE MODE’; पदांची मागणी करण्यापूर्वी कामाचा हिशेब द्या!
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एस.पी. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. एस. बी. पाटील हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी आयुष्यात वकिलांशी आलेले विविध अनुभव आणि जी. एस. पाटील विधी महाविद्यालय सुरू करतानाचा यशस्वी प्रवास उपस्थितांसमोर मांडला.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या नवप्रविष्ट विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.




