जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करा; अन्यथा ठेकेदार काळ्या यादीत!
पालकमंत्री उदय सामंत यांचा सक्त इशारा; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन, २२ मच्छीमारांना कृषी दराने वीज देण्याचे निर्देश

रत्नागिरी : रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा सक्त इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला. भविष्यातील संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शासकीय विश्रामगृहात रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉ. सामंत बोलत होते. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल दाभोळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्यासह मतदारसंघातील ठेकेदार उपस्थित होते.
जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करावे. कामांमध्ये स्थानिक नागरिक किंवा अन्य कोणाकडून अडथळे निर्माण होत असल्यास संबंधितांविरोधात पोलीस विभागाकडे तक्रार करावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणार
शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून डॉ. उदय सामंत यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महाविद्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता, प्रशिक्षणाच्या अपुऱ्या संधी आणि प्रयोगशाळेत पुरेशी उपकरणे उपलब्ध नसल्याच्या समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या.
या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना वाव मिळावा, यासाठी टेक्निकल फेस्टिव्हल आणि ऑटो एक्स्पोसारखी प्रदर्शने आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर अकोजवार, विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
२२ मच्छीमारांना कृषी दराने वीज देण्याचे निर्देश
मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यकास्तकारांना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सुविधा व सवलती देण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. ९ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, प्रक्रिया उद्योग वगळता संबंधित लाभार्थ्यांना कृषीदराने वीजपुरवठा देण्याची तरतूद आहे.
या योजनेअंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाने महावितरणकडे ५६ प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी २२ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांना कृषी दराने वीजपुरवठा करण्यात यावा, असे निर्देश डॉ. सामंत यांनी दिले.
या बैठकीला सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय जीवन सावंत, नगरसेवक बंड्या साळवी, माजी नगरसेवक सुदेश मयेकर आणि अॅड. समृद्धी मयेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.




