Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

दुष्काळावर मात करण्यासाठी ‘समृद्ध पंचायतराज अभियान २.०’; जलसंधारणाच्या कामांना निधीची हमी

तलावांतील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि पावसाचे पाणी अडविण्यावर भर; शेतकरी व कष्टकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : ग्रामीण भागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासोबतच यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे, गावांतील तलावांचा गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. या कामांसाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’, अभियान २०२५-२६ चा पुरस्कार वितरण सोहळा, अभियान २०२६-२७ चा शुभारंभ आणि ‘सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यूथ फेस्टिव्हल मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि राज्यभरातील सरपंच उपस्थित होते.

जलसंधारणाला प्राधान्य; शासनाकडून निधीची हमी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागातील सामूहिक शक्तीला चालना देऊन गावांच्या विकासाला गती देणारे महत्त्वपूर्ण अभियान आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते, हे जलयुक्त शिवार अभियानाने दाखवून दिले आहे. याच अनुभवातून समृद्ध पंचायतराज अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यंदा सुरुवातीला अतिवृष्टी आणि त्यानंतर पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये शासनाने १२ प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. आगामी काळात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. माणसे आणि जनावरांसाठी पाणी राखून ठेवतानाच रब्बी हंगामाचे योग्य नियोजन करावे. गावांतील तलावांचा गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणे आणि जलतारा संरचना मोठ्या प्रमाणावर उभारणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

हेही वाचा –  पोषणाचा संदेश घराघरांत; चांदिवली प्रकल्पात राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा

‘जी रामजी’ योजनेतून जलसंधारण आणि रोजगार

‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून विविध योजनांचे अभिसरण करून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे पाणीसाठा वाढण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना आपले पशुधन विकावे लागू नये, यासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याचे नियोजनही शासन करणार आहे. शेतीव्यवस्था टिकविण्यासाठी पशुधनाचे संरक्षण महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीत कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही, याची काळजी शासन घेईल. पात्र शिधापत्रिकाधारकांना आवश्यक अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासह शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचविण्यात येतील. संकटाच्या काळात शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात दुष्काळ निवारण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येणार आहे. तलावांतील गाळ काढणे, जलसंधारणाची कामे करणे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी अभियानाच्या गुणांकन पद्धतीतही आवश्यक बाबींचा समावेश करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

पहिल्या टप्प्यात ५,६४४ ग्रामपंचायतींचा सहभाग

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, गावे समृद्ध झाली तर विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यास मोठे पाठबळ मिळेल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ५ हजार ६४४ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला. अभियानाच्या माध्यमातून ६९ लाख १३ हजार आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली. विविध योजनांच्या अभिसरणातून घरकुलांचे लाभ, दिव्यांग लाभार्थ्यांना मदत, सीसीटीव्ही यंत्रणा, रस्ते, स्वच्छतागृहे, व्यायामशाळा आणि जलपुनर्भरणाची कामे करण्यात आली.

राज्यात २ हजार ७०६ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून पाणंद रस्ते, सौरऊर्जेचा वापर, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली आणि ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविण्यावरही भर देण्यात आला. गावांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वयंपूर्ण व समृद्ध बनविण्यासाठी अभियानाचा दुसरा टप्पाही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा पुरस्काराने गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियान २०२५-२६ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

जिल्हा परिषद गटात नाशिक, पुणे आणि सांगली यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. पंचायत समिती गटात नाशिक, खालापूर (जि. रायगड) आणि राहाता (जि. अहिल्यानगर) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ग्रामपंचायत गटात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अडाचीवाडी ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील खामशेत आणि नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील लाडूद ग्रामपंचायतींना विभागून द्वितीय पुरस्कार देण्यात आला. तर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उटी बु. आणि नागपूर जिल्ह्यातील कोतवालबर्डी ग्रामपंचायतींना विभागून तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची माहिती दिली. सुशासन, कार्यक्षमता, लोकसहभाग, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणपूरक विकासाला प्रोत्साहन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून पंचायत प्रगती निर्देशांक उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जलतारा तज्ज्ञ प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ आणि ज्येष्ठ जलसंधारण कार्यकर्ते पद्मश्री पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. अभियानाचा पहिला टप्पा प्रभावीपणे राबविण्यात योगदान दिल्याबद्दल प्रधान सचिव एकनाथ डवले आणि यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार गोकुळ गीते, प्रा. देवयानी फरांदे, दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, ॲड. राहुल ढिकले, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, सरोज अहिरे, नितीन पवार, विवेक कोल्हे, उपमहापौर विलास शिंदे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्यासह राज्यभरातील सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button