Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार; विकासकामांना गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून आधुनिक पायाभूत सुविधा उभारणार; दर्शनपथ, गोदाघाट, द्वारका सर्कल आणि ओझर विमानतळाच्या कामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

नाशिक : आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांना वेग देण्यात येत आहे. या कामांमुळे दोन्ही शहरांचा चेहरामोहरा बदलणार असून, पुढील २५ ते ३० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देताना सर्व कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण समारंभाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ आणि गोदाघाट परिसरासह नाशिकमधील द्वारका सर्कल आणि ओझर विमानतळ येथील विकासकामांची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती, प्रगती आणि आगामी नियोजनाची माहिती घेण्यात आली. कामांचा वेग वाढवून ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पुढील ३० वर्षांच्या विकासाचे नियोजन

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेली विकासकामे केवळ धार्मिक सोहळ्यापुरती मर्यादित नसून, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या दीर्घकालीन विकासाचा पाया मजबूत करणारी आहेत. वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, धार्मिक पर्यटन आणि नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा या बाबींवर भर देण्यात येत आहे.

महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि अन्य संबंधित विभागांच्या समन्वयातून ही कामे सुरू आहेत. सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून प्रकल्पांना गती दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांचे अभिनंदन केले. विशेषतः MSRDC ने हाती घेतलेल्या महत्त्वपूर्ण कामांचे त्यांनी कौतुक केले.

हेही वाचा –  अहिराणी साहित्याच्या संवर्धनासाठी धुळ्यात स्वतंत्र केंद्र उभारणार; साहित्य संमेलनाला दरवर्षी १० लाखांचे पाठबळ

त्र्यंबकेश्वरच्या विकासाला नवी दिशा

त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ आणि गोदाघाट परिसरातील विकासकामे आव्हानात्मक असली, तरी ती नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहेत. देशभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेऊन परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. या कामांमुळे भाविकांना अधिक सुलभ सुविधा मिळण्यासोबतच धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा विचार करून परिसराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी कुंभमेळ्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सुविधा उभारण्याबरोबरच त्यांचा दीर्घकालीन उपयोग होईल, असे नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

द्वारका सर्कलचे काम वेगाने सुरू

नाशिकमधील द्वारका सर्कल येथील विकासकाम अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक आहे. हे काम नियोजनानुसार वेगाने सुरू असून निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या उद्भवू नये, यासाठी पाणी निचऱ्याची चाचणी करण्यात आली आहे. पावसाचे पाणी साचणार नाही आणि त्याचा निचरा सुरळीत होईल, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणावरही लक्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचीही पाहणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिकला येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन विमानतळाशी संबंधित विकासकामांनाही गती देण्यात येणार आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना आवश्यक वाहतूक, पायाभूत सुविधा आणि इतर सेवांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार हिरामण खोसकर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, MSRDC चे अधिकारी ब्रिजेश दीक्षित आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button