‘राहुल गांधी MPSC आंदोलनात आले तर आंदोलन संपेल’ – परिणय फुकेंचा दावा
सुप्रिया सुळेंसोबत जमत नसल्याने रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत? परिणय फुकेंचे गंभीर आरोप; राहुल गांधींवरही निशाणा

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाल्यास त्याच दिवशी रोहित पवारांचे आंदोलन संपुष्टात येईल, असा आरोपही फुके यांनी केला.
रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद असल्याचा दावा करत, रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक आरोपही परिणय फुके यांनी केला. राहुल गांधी यांच्याशी जवळीक वाढविण्याच्या उद्देशानेच रोहित पवारांकडून सध्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला जात असल्याचे फुके म्हणाले. मात्र, या आरोपांबाबत रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
दरम्यान, मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपावरही परिणय फुके यांनी टीका केली. मतदार यादीतील अनेक नावे जुन्या पत्त्यावरून कायमचे स्थलांतरित झालेल्या नागरिकांची असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी फुके यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप करत, मतदार यादीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा दावा केला. भारताची प्रगती काही पाश्चिमात्य देशांना पाहवत नसल्याने राहुल गांधी यांच्या माध्यमातून भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसच्या राजकारणामागे अति डाव्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचा आरोप करत फुके यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवरही टीका केली. राहुल गांधी यांच्या आंदोलनामागील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तीव्र शब्दांत निशाणा साधला.
याशिवाय नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे नेते अनिल सोले हे निश्चितच माघार घेतील, असा विश्वासही परिणय फुके यांनी व्यक्त केला. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे दावे आणि आरोप केले.




