त्रिपुरातील विद्यार्थ्यांची राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याशी भेट; महाराष्ट्राच्या संस्कृती, इतिहासाची घेतली माहिती
आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी राज्यपालांचा संवाद; शैक्षणिक भेटीतून राष्ट्रीय एकात्मता बळकट होण्याचा विश्वास

मुंबई : महाराष्ट्राच्या शैक्षणिक भेटीवर आलेल्या अगरताळा, त्रिपुरा येथील आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची माहिती दिली.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यपालांनी महाराष्ट्राच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीबरोबरच राज्याचा समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि परंपरांची माहिती दिली. महाराष्ट्राला भेट देऊन येथील विविध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांची माहिती घेण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
हेही वाचा – राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे आंतर-महाविद्यालयीन ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत वर्चस्व; पटकावले विजेतेपद!
विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक भेटीचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी आसाम रायफल्सचे अभिनंदन केले. देशातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना एकमेकांच्या प्रदेशातील संस्कृती, इतिहास आणि परंपरांची ओळख होण्यासाठी अशा शैक्षणिक भेटी उपयुक्त ठरतात.
महाराष्ट्र आणि त्रिपुरा यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या विविधतेतील एकतेची भावना दृढ होण्यास या भेटीमुळे मदत होईल. अशा उपक्रमांमधून राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट होईल, असा विश्वास राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केला.




