नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच एक रंजक माहिती समोर आली आहे. या मतदारसंघातील तब्बल १४ आमदार आणि २ खासदारांना निवडणुकीत मतदान करता येणार नाही. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या अनेक लोकप्रतिनिधींचे शिक्षण पदवीपर्यंत झालेले नसल्याने त्यांचे नाव पदवीधर मतदार यादीत समाविष्ट झालेले नाही.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळण्यासाठी संबंधित व्यक्ती पदवीधर असणे आवश्यक असते. नागपूर विभागातील ३२ आमदारांपैकी १४ आमदारांची शैक्षणिक पात्रता पदवीपेक्षा कमी असल्याने त्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.
या यादीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. आमदारांबरोबरच रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि राज्यसभा खासदार माया इवनाते यांनाही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.
हेही वाचा – ‘राहुल गांधी MPSC आंदोलनात आले तर आंदोलन संपेल’ – परिणय फुकेंचा दावा
कोणत्या आमदारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी?
नागपूर जिल्हा :
- कृष्णा खोपडे – ७ वी
- चरणसिंह ठाकूर – १२ वी
- मोहन मते – ITI
- प्रवीण दटके – डिप्लोमा प्रथम वर्ष
- चंद्रशेखर बावनकुळे – B.Sc. प्रथम वर्ष
चंद्रपूर जिल्हा :
- विजय वडेट्टीवार – १० वी
- किशोर जोरगेवार – १० वी
भंडारा जिल्हा :
- राजू कारेमोरे – १२ वी
- नाना पटोले – B.A. द्वितीय वर्ष
गोंदिया जिल्हा :
- विनोद अग्रवाल – १२ वी
- संजय पुराम – १२ वी
गडचिरोली जिल्हा :
- धर्मरावबाबा आत्राम – १० वी
वर्धा जिल्हा :
- समीर कुणावार – १२ वी
- राजेश बकाने – B.A. प्रथम वर्ष
दोन खासदारांनाही मतदानाचा अधिकार नाही
नागपूर विभागातील दोन खासदारांचाही पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत समावेश झालेला नाही. माया इवनाते यांचे शिक्षण ५ वीपर्यंत, तर श्यामकुमार बर्वे यांचे शिक्षण B.A. द्वितीय वर्षापर्यंत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही विशिष्ट शैक्षणिक पात्रता असलेल्या मतदारांसाठी असल्याने लोकप्रतिनिधी असतानाही पदवीची अट पूर्ण न करणाऱ्या आमदार आणि खासदारांना या निवडणुकीत मतदान करता येत नाही. त्यामुळे नागपूर विभागातील या निवडणुकीत लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.




