Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

२२ मिनिटे जाहिराती दाखवणे भोवले; ‘PVR’ला ग्राहक आयोगाचा ७५ हजारांचा दंड!

PVR Cinemas | तिकिटावर नमूद केलेल्या वेळेत चित्रपट सुरू न करता प्रेक्षकांना सलग २२ मिनिटे जाहिराती आणि ट्रेलर दाखवणे पीव्हीआर सिनेमाज (PVR Cinemas) आणि पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडला (PVR INOX Limited) चांगलेच महागात पडले आहे. ही बाब सेवेतील त्रुटी आणि अनुचित व्यापार पद्धत (Unfair Trade Practice) ठरवत हैदराबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मल्टिप्लेक्स कंपनीला तक्रारदारास २५ हजार रुपये भरपाई देण्याचे, तसेच ५० हजार रुपये ग्राहक कल्याण निधीत जमा करण्याचे असे एकूण ७५ हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत.

हैदराबादमधील अधिवक्ता चंदा अथिश कुमार यांनी २० जून २०२५ रोजी ‘कुबेरा’ या चित्रपटाची दोन तिकिटे ५०० रुपयांना खरेदी केली होती. तिकिटावर खेळाची वेळ रात्री १०.३५ वाजताची होती. ते आपल्या जागेवर १०.३० वाजता हजर झाले असता १०.३५ पर्यंत जाहिराती संपतील अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, १०.५२ वाजेपर्यंत जाहिराती आणि ट्रेलरच सुरू राहिले. तब्बल २२ मिनिटांचा खोळंबा झाल्याने वेळ वाया गेल्याची आणि गैरसोय झाल्याची तक्रार त्यांनी ग्राहक आयोगाकडे दाखल केली. यात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ३० नोव्हेंबर २०२३ च्या नियमावलीचा दाखला दिला; ज्यानुसार सार्वजनिक संदेशांसाठी ठरावीक कालावधी निश्चित केलेला असतो.

हेही वाचा

“भारतात शांतता जाणवत नाही” वक्तव्यावर संजय दत्तचे स्पष्टीकरण; म्हणाला, “ते केवळ विनोदासाठी स्क्रिप्टेड..”

कंपनीने बचावात युक्तिवाद केला की, जाहिराती व ट्रेलर दाखवणे हा व्यवसाय करण्याचा मूलभूत अधिकार असून कायद्याने यावर पूर्ण बंदी घातलेली नाही. मात्र, आयोगाचे अध्यक्ष वक्कंती नरसिंह राव आणि सदस्य सुम वला यांच्या खंडपीठाने हा दावा फेटाळून लावला. ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांना व्यावसायिक जाहिराती दाखवणे ही सेवेत गंभीर त्रुटी असल्याचे मंचाने स्पष्ट केले.

४५ दिवसांत अंमलबजावणीचे आदेश

ग्राहक आयोगाने पीव्हीआर आयनॉक्सला तक्रारदारास २० हजार रुपये नुकसानभरपाई आणि ५ हजार रुपये न्यायालयीन खर्चापोटी देण्याचे निर्देश दिले. याशिवाय ५० हजार रुपयांचा दंड ग्राहक कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश दिले. हा आदेश ४५ दिवसांत पूर्ण न केल्यास संबंधित रकमेवर वार्षिक ९ टक्के व्याज आकारले जाईल, असा इशाराही मंचाने दिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button