“भारतात शांतता जाणवत नाही” वक्तव्यावर संजय दत्तचे स्पष्टीकरण; म्हणाला, “ते केवळ विनोदासाठी स्क्रिप्टेड..”

Sanjay Dutt | “मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही,” या आपल्या व्हायरल विधानावरून वाद पेटल्यानंतर बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘शेखर टुनाइट’ या शोमधील ते विधान पूर्णपणे पूर्वनियोजित (स्क्रिप्टेड) होते आणि त्याचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसून केवळ हलका-फुलका विनोद व व्यंग करणे हाच होता, असे संजय दत्तने स्पष्ट केले आहे. दुर्दैवाने आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढून मूळ संदर्भ बदलण्यात आल्याची खंतही त्याने व्यक्त केली.
कार्यक्रमात बोलताना संजय दत्त म्हणाला होता, “आपल्या देशातील नागरिक अत्यंत प्रेमळ असून इथे कायम शांतता असायला हवी, मात्र मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही. भारतीय लोक मोठ्या मनाचे आणि आदरातिथ्य करणारे आहेत. आपण जगाला भरभरून दिले असून तसेच राहिले पाहिजे. ते शांततेचे जुने दिवस पुन्हा लवकर परतावेत, अशी प्रार्थना मी महादेवाच्या चरणी करतो.” या विधानावरून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

हेही वाचा
वादानंतर खुलासा करताना संजय दत्त म्हणाला, “कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा संस्थेचा अपमान अथवा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी जे काही बोललो, ते ‘मुन्ना भाई’ चित्रपटासारख्या हलक्या-फुलक्या विनोदी शैलीत आणि ‘गांधीगिरी’च्या उपरोधात्मक संदर्भात मांडले होते. प्रेम, आपुलकी आणि एकोप्याचा संदेश देण्याचा तो प्रयत्न होता; परंतु त्याचे चुकीचे अर्थ काढले गेले.”
मोदी आणि ट्रम्प यांना टोले
या कार्यक्रमात एका काल्पनिक पंतप्रधानाची भूमिका वठवत संजय दत्तने राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले. जनतेशी संवाद कायम ठेवण्यासाठी मी सतत देशातच राहीन, असा टोला त्याने पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांचा संदर्भ देत लगावला. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘ट्रम्प मामू’ असा उल्लेख करत ते जागतिक शांततेवर परिणाम करत असल्याचे तो म्हणाला. ट्रम्प यांनी आक्रमकता सोडून ‘गांधीगिरी’ स्वीकारावी आणि देशांवर सतत ‘टॅरिफ’ लादण्याऐवजी लोकांची ‘तारीफ’ (कौतुक) करायला शिकावे, असा मिश्कील सल्ला देत त्याने त्यांना ‘जादूची झप्पी’ देण्याची गरज असल्याचे नमूद केले.




