विद्या व्हॅली नॉर्थ पॉइंट स्कूलच्या मायरा पाटीलची जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी चार प्रकारांत कांस्यपदके; विभागीय स्तरावर निवड

पिंपरी-चिंचवड : विद्या व्हॅली नॉर्थ पॉइंट स्कूलसाठी अभिमानाचा क्षण! शाळेची इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी कु. मायरा पाटील हिने जिल्हा परिषद जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत ११ वर्षांखालील गटात चार कांस्यपदके पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.इनलाइन स्केटिंग प्रकारात सहभागी झालेल्या मायराने इनलाइन ट्रॅक शर्यतीतील २.५ लॅप व ५ लॅप, तसेच इनलाइन रोड शर्यतीतील १ लॅप व ५ लॅप अशा चार प्रकारात कांस्य पदके मिळवली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची विभागीय (झोनल) स्तरावरील स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, ती आता तेथे शाळेचे प्रतिनिधित्व करणार आहे. एवढ्या लहान वयात मायराने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या प्रा. पल्लवी शिंदे यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “आमच्या या लहानग्या खेळाडूचा आम्हा सर्वांना अत्यंत अभिमान आहे.
हेही वाचा – शेतशिवारात पुन्हा हिरवळ फुलू दे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्री मयुरेश्वराच्या चरणी प्रार्थना

आगामी विभागीय स्पर्धेसाठी तिला खूप खूप शुभेच्छा,” असे त्या म्हणाल्या. शाळेचे संचालक डॉ. अशोक देवीकर यांनीही मायराचे कौतुक करून तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मायराच्या या यशामागे शाळेच्या क्रीडा शिक्षिका सौ. श्रुती साखरे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पाठबळ आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले. त्यांच्या परिश्रमांबद्दल शाळा व्यवस्थापनाने त्यांचे विशेष आभार मानले. मायराच्या या कामगिरीमुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण विद्या व्हॅली नॉर्थ पॉइंट स्कूल परिवारात आनंदाचे वातावरण आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विभागीय स्पर्धेतही ती अशीच दमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.




