Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर थेट जनतेच्या भेटीला; १ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’

५ डिसेंबरपर्यंत आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा; प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयांची तपासणी, नागरिकांच्या सूचनांनुसार सुधारणांवर भर

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून, आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.

आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत कितपत पोहोचतो, आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि रुग्णसेवेत कोणत्या अडचणी येतात, याची माहिती यात्रेदरम्यान घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची पाहणी करण्यात येणार आहे. यासोबतच आरोग्य उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये, मनोरुग्णालये आणि विशेष रुग्णालयांपर्यंतच्या सेवांचाही आढावा घेतला जाणार आहे.

आरोग्य सुविधांबाबत नागरिकांशी थेट संवाद

लोकसहभाग वाढविण्यासाठी जिल्हा, तालुका, महापालिका आणि ग्रामपातळीवरील आरोग्य समित्यांच्या बैठका स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित केल्या जाणार आहेत. या बैठकांमध्ये आरोग्य संस्थांमधील आवश्यक सुविधा, मनुष्यबळ, औषधांचा पुरवठा, रुग्णसेवेतील अडचणी आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी याबाबत सूचना मागविण्यात येतील.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, मोफत डायलिसिस, एमआरआय व सीटी स्कॅन, स्टेमी उपचार, टेलिमेडिसिन, मोफत रक्त तपासण्या, १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवा, जननी सुरक्षा योजना, माहेरघर आणि मानसिक आरोग्य समुपदेशन यांसारख्या सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. संबंधित अधिकारी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन पात्र रुग्णांना उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा –  वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया होणार पूर्णपणे ऑनलाइन; संस्थास्तरीय फेरी बंद

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाशी सांगड

‘आरोग्य संवाद यात्रा’ ही ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाशी जोडण्यात येणार आहे. या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत जनजागृती केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांमध्ये ग्रामपातळीवरील लोकसहभाग वाढविण्यावरही विशेष भर राहणार आहे.

नागरिकांच्या सूचनांनुसार आरोग्य सेवांमध्ये सुधारणा

ही यात्रा केवळ आरोग्य योजनांची माहिती देणारी मोहीम नसून, नागरिकांचे अनुभव आणि सूचना यांच्या आधारे आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य समित्या, लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात समन्वय वाढवून आरोग्य सेवांबाबतची उत्तरदायित्वाची भावना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

नागरिकांच्या गरजा समजून घेणे, आरोग्य सेवांमधील त्रुटी ओळखणे आणि प्राप्त सूचनांच्या आधारे आवश्यक सुधारणा घडवून आणणे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

५ डिसेंबरनंतर राज्यस्तरीय आढावा

या यात्रेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि विविध आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत. यात्रेदरम्यान मिळालेल्या सूचना आणि अभिप्रायांचा आढावा घेण्यासाठी ५ डिसेंबरनंतर राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत राज्यस्तरीय आरोग्य समिती सदस्यांची बैठक घेण्याचे नियोजन आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button