रशिया-युक्रेन युद्धात भारताची थेट मध्यस्थी; केवळ सल्ले देण्यापलीकडे जाऊन मध्यस्थीची तयारी, एस. जयशंकर यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेनमधील प्रदीर्घ संघर्ष संपवण्यासाठी भारताने आता केवळ सल्लागाराची भूमिका ओलांडून प्रत्यक्ष व सक्रिय मध्यस्थी करण्यास सुरुवात केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली असून, “आम्ही केवळ सल्ले देण्याच्या भूमिकेच्या पुढे गेलो असून हे युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांमध्ये आता थेट सहभागी झालो आहोत,” असे स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीत आयोजित ‘म्युनिक लीडर्स मिटिंग’मध्ये ते बोलत होते. भारत सध्या मॉस्को आणि कीव्ह या दोन्ही देशांशी सातत्याने संपर्कात असून शांततेचा शाश्वत तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले की, हा संघर्ष केवळ मुत्सद्देगिरी आणि चर्चेच्या माध्यमातूनच संपुष्टात येऊ शकतो यावर भारताचा ठाम विश्वास आहे. काळा समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील जहाजांची सुरक्षित वाहतूक, जागतिक धान्य पुरवठा सुरळीत ठेवणे, ऊर्जा निर्यात आणि एकमेकांच्या महत्त्वाच्या नागरी व ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले न करणे या मुद्द्यांवर रशिया व युक्रेनमध्ये एकमत घडवून आणण्यासाठी भारत विशेष प्रयत्न करत आहे.
हेही वाचा
अमेरिकेत AI चे नाव बदलले; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ‘SIF’ ची स्थापना
जयशंकर यांच्या वक्तव्यापूर्वी युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री सिबिहा यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला होता. युद्धबंदीसाठी तुर्किये, इजिप्त आणि अमेरिकेकडून प्रस्ताव आले असले, तरी भारताने मांडलेला शांतता प्रस्ताव हा सर्वांत अधिक ‘व्यापक आणि सर्वसमावेशक’ असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. भारताने पहिल्यांदाच या जागतिक युद्धात इतकी थेट आणि मोठी मुत्सद्दी भूमिका घेण्याची तयारी दर्शवली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शांतता प्रयत्नांचे व सकारात्मक दृष्टीकोनाचे यापूर्वीच कौतुक केले आहे.
रशियासोबतच्या ऐतिहासिक संबंधांवर ठाम भूमिका
युरोपीय देशांच्या आक्षेपांचा संदर्भ देत जयशंकर यांनी रशिया-भारत संबंधांवर परखड भाष्य केले. “१९५० च्या दशकापासून रशियाने भारताला प्रत्येक कठीण प्रसंगात, विशेषतः सुरक्षेच्या मुद्द्यावर नेहमीच साथ दिली आहे. भारत हा इतिहास कधीही विसरू शकत नाही. युरोपचा इतिहास आणि अनुभव वेगळा असू शकतो, पण भारताचा अनुभव नेहमी सकारात्मक राहिला आहे. आज रशियासोबतचे आमचे संबंध केवळ संरक्षण किंवा अणुऊर्जेपुरते मर्यादित नसून व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रातही विस्तारले आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.





