शिवसेना शिंदे गटात बंड; अमरावतीत महायुतीची डोकेदुखी वाढली
शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीकांत देशपांडे यांचा पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल; उमेदवारी न मिळाल्यास शिक्षक आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची घोषणा

अमरावती : आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच अमरावती शिक्षक मतदारसंघात उमेदवारीवरून नवी घडामोड समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यातील एक अर्ज पक्षाकडून, तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत देशपांडे यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचा आपला अधिकार असल्याचे सांगत, उमेदवारी नाकारली तरी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास शिक्षक आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देशपांडे म्हणाले की, राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून आपण शिवसेनेत कार्यरत आहोत. त्यामुळे पक्षाच्या तिकिटावर आपलाच पहिला अधिकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याच कारणामुळे पक्षाकडून एक आणि अपक्ष म्हणून दुसरा अर्ज दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात यंदा विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाने प्रा. डी. एस. लहाने यांना उमेदवारी जाहीर केल्याचे वृत्त आहे, तर काँग्रेसकडून प्रा. आदिती पोहरे यांचे नाव पुढे आले आहे. महायुतीकडून अंतिम उमेदवार अद्याप स्पष्ट झालेला नसताना देशपांडे यांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केल्याने जागावाटपाच्या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.
हेही वाचा – ‘पंजाबला नशामुक्त करण्याची क्षमता भाजपमध्ये’; राघव चड्ढा यांचा दावा
पुण्यातही महायुतीत जागांवरून रस्सीखेच
दुसरीकडे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे पारंपरिक मतदारसंघ असल्याचे सांगितले आहे. मात्र, महायुती म्हणून निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील वरिष्ठ नेते घेतील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांनीही महायुती म्हणून निवडणूक लढण्याचा प्रयत्न असल्याचे सांगताना, गरज पडल्यास भाजप या दोन्ही जागांवर स्वतंत्रपणे लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पुणे पदवीधर मतदारसंघावर, तर शिवसेना शिंदे गटाकडून पुणे शिक्षक मतदारसंघावर दावा केला जात असल्याने महायुतीतील जागावाटपाकडे लक्ष लागले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यातील दोन्ही मतदारसंघांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निर्णय घेतील, असे सांगितले आहे.





