अंगणवाडी सेविका भावी पिढीच्या घडणीचा कणा : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे
पिंपळे सौदागरमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सेविकांचा गौरव

पिंपरी- चिंचवड | “बालकांचे आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अंगणवाडी सेविका अविरत सेवा बजावतात. त्या समाजसेवेचा आणि भावी पिढीच्या घडणीचा खरा कणा आहेत. त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी सदैव खंबीरपणे उभी राहील,” असे प्रतिपादन भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पिंपळे सौदागर येथील अंगणवाडी शाळेत सेविकांचा विशेष सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या काटे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांचा गौरव करण्यात आला.
बालकांवर उत्तम संस्कार घडविणे, कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्न करणे आणि तळागाळातील बालके व मातांपर्यंत आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा पोहोचविण्यात अंगणवाडी सेविकांचे मोलाचे योगदान असल्याचे काटे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या ‘सेवा, सुशासन आणि जनकल्याण’ या ध्येयाला अनुसरून सेविकांच्या कार्याची दखल घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा
‘दृश्यम ३: द कन्क्लुजन’साठी अजय देवगणला कोट्यवधींचे मानधन; तब्बू आणि श्रिया सरनची फी किती?

“लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत अंगणवाडी सेविकांचे कार्य विस्तारलेले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अशा ‘राष्ट्रसेविकां’चा गौरव करताना आम्हा सर्वांना मनस्वी आनंद होत आहे,” अशा भावना काटे यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमास नगरसेविका अनिता काटे, कुंदा भिसे, अर्चना तापकीर, मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, संदेश काटे पाटील, संदीप काटे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
अंगणवाडी सेविका या बालकांच्या आरोग्याचा, शिक्षणाचा आणि भावी पिढीच्या घडणीचा भक्कम आधार आहेत. कुपोषणमुक्तीपासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत त्यांचे योगदान मोलाचे आहे. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत त्यांचा गौरव करणे हा त्यांच्या निःस्वार्थ सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभी राहील.
– शत्रुघ्न (बापू) काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.





