Asian Games 2026: भारताची फायनलमध्ये धडक, आता पाकशी भिडणार; कधी, कुठे अन् किती वाजता रंगणार महामुकाबला?

Asian Games 2026 | आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुष क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा १२४ धावांच्या प्रचंड फरकाने दारुण पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली आहे. इशान किशनचे वादळी अर्धशतक आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ अवघ्या ४५ धावांत गारद झाला. या दणदणीत विजयासह भारताने सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला असून ३ ऑक्टोबर रोजी फायनलमध्ये भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १६७ धावा उभारल्या. भारताकडून यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने एकट्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत ८० धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.
हेही वाचा
श्रीलंकेची निचांकी धावसंख्या
विजयासाठी मिळालेल्या १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय माऱ्यापुढे नांगी टाकली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या ४५ धावांत पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील श्रीलंकेची ही आजवरची सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी श्रीलंकेची निचांकी धावसंख्या ७७ धावा (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, न्यूयॉर्क २०२४) अशी होती.
सुवर्णपदकासाठी ३ ऑक्टोबरला महासंग्राम
पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच धडक मारली आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान असा हायव्होल्टेज अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. येत्या ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ही सुवर्णपदकाची लढत रंगणार असून याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल.





