ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मीरा भाईंदर ही जैन नगरी अन् मिनी राजस्थान”; भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या विधानाने वाद पेटला

मुंबई | भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आपल्या एका वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मीरा-भाईंदरचा उल्लेख थेट “मिनी राजस्थान आणि जैनांची नगरी” असा केल्याने नवा वाद पेटला आहे. या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून, यावरून मराठी भाषिक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे; तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (मनसे) या भूमिकेविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मेहता म्हणाले, “मी अशा नगरीतून येतो जिथं मिनी राजस्थान, जैनांची नगरीही म्हटलं जातं. मीरा भाईंदरमध्ये ३३ पेक्षाही जास्त जैनालय आहेत. साधु-महात्मांचं आगमन येथे होत असतं. गुरूदेवांचं माझ्यावर निरंतर आशीर्वाद असतो. यावेळी अत्यंत अटीतटीची निवडणूक होती, पण त्यांचा आशीर्वाद मिळाला की प्रेरणा मिळते. माझं भाग्य आहे की माझा जन्म जैन कुळात झाला. मीरा भाईंदरमध्ये जेव्हा जेव्हा जैनांचा विषय येतो तेव्हा आम्ही ताकदीने उभे राहतो.”

यापूर्वी त्यांच्या शाळेत पर्युषण पर्वादरम्यान कंदमुळांवर आणलेल्या बंदीवरून मोठा गदारोळ झाला होता. त्यावर बोलताना मेहता म्हणाले, “मी शाळाही चालवतो. पर्युषण काळात माझ्या शाळेत कंदमुळे खाण्यास बंदी आहे. यावरून प्रचंड वाद झाला. परंतु, आम्ही मागे हटलो नाही. मी बंदी कायम ठेवली. आम्ही आमच्यावर विचारांवर चालत आलोय.”

हेही वाचा

Asian Games 2026: भारताची फायनलमध्ये धडक, आता पाकशी भिडणार; कधी, कुठे अन् किती वाजता रंगणार महामुकाबला?

जैन समाजातील धर्मगुरुंसाठी पांढरी पट्टी आखल्यावरूनही काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावरून मेहतांनी वक्तव्य केलं. “जैन गुरू अनवाणी चालतात, त्यामुळे त्यांच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून पांढऱ्या पट्ट्या लावल्या, त्यावरही आम्ही मागे हटलो नाही”, असं मेहता म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मेहता यांच्या या विधानावर मनेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. मनसेचे मीरा भाईंदर विधानसभेचे अध्यक्ष सचिन पोपळे यांनी नरेंद्र मेहतांवर टीका केली. ते म्हणाले, “मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी ठाण्यात जाऊन गरळ ओकली आहे. त्यांचं म्हणणं आहे की मीरा भाईंदर ही जैनांची नगरी आहे. नरेंद्र मेहताजी उलटे सुलटे धंदे बंद करा आणि वाद वाढवणं बंद करा. मनसे तुम्हाला ठाम सांगते की मीरा भाईंदर हे कोळी, आगरी आणि मराठी माणसांचं आहे.“

“पर्युषण काळात तुम्ही लहान मुलांच्या डब्यात कंदमुळे बंद केली. त्याला मनसेने विरोध केला. तेव्हा तुमच्या शाळेच्या पोर्टलवरून तुम्ही हा नियम मागे घेतला. तिसरं तुम्ही सांगितलं की जैन मुनी फिरतात तेव्हा पांढरे पट्टे मारले. पांढऱ्या पट्ट्यांचा वाद वाढला तेव्हा मनसेने तिथे जाऊन काळे पट्टे मारले होते. त्यामुळे नसते डायलॉग बंद करा. लहान मुलांच्या डब्यात कंदमुळे चालत नाहीत, पण तुमच्या हॉटेलमध्ये दारू विकता, तिथं सगळी कंदमुळे विकली जातात. म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये धर्म लागतो पण व्यवसायात आणि पैसे कमावण्यासाठी धर्म लागत नाहीत”, असं सचिन पोपळे म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button