एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “वाचनातून जीवनाचा शोध” संकल्पनेवर ग्रंथालय सप्ताह व राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड : एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने “वाचनातून जीवनाचा शोध” या संकल्पनेवर आधारित ग्रंथालय सप्ताह व राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचे आयोजन २८ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथालयाविषयी आपुलकी निर्माण करणे, चांगल्या वाचनसवयी रुजवणे आणि वाचनकौशल्य अधिक बळकट करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, डॉ. अक्षदा कुलकर्णी आणि प्रमुख पाहुणे सरस्वती रात्र महाविद्यालय, पुणे येथील ग्रंथपाल श्री. राजेश अगव्हाणे यांच्या हस्ते झाले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना संचालक डॉ. बी. बी. वाफारे म्हणाले, “वाचन हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडवण्याची प्रक्रिया आहे. डिजिटल युगातही पुस्तकांशी असलेले नाते टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. ग्रंथालय सप्ताह यासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय आयुष्यभर जोपासावी.”
प्रमुख पाहुणे श्री. राजेश अगव्हाणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “ग्रंथालय हे महाविद्यालयाचे हृदय असते. साहित्य आपल्याला समाजाकडे संवेदनशीलतेने पाहायला शिकवते. वाचनातून मिळणारी विचारशक्ती आणि संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे भांडवल आहे. तरुणांनी दररोज किमान काही वेळ पुस्तकवाचनासाठी द्यावा.”
हेही वाचा – नवरात्र-दिवाळीपूर्वी साखरेच्या दरवाढीची चिंता; उत्पादन घटल्याने बाजारावर दबाव

सप्ताहानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रील मेकिंग स्पर्धेत कॅम्पस जीवन व विद्यार्थी अनुभव, कौशल्य व कलागुण सादरीकरण, तसेच मानसिक आरोग्य, पर्यावरणपूरक सवयी, डिजिटल डिटॉक्स, लैंगिक समानता व रस्ता सुरक्षा यांसारख्या सामाजिक जनजागृतीच्या विषयांचा समावेश होता. पुस्तक परीक्षण स्पर्धेत “महाविद्यालयीन जीवनात मला मार्गदर्शक ठरलेले पुस्तक”, नेतृत्व व उद्योजकता, करिअर व प्रेरणा, मानसिक आरोग्य, साहित्यातील सामाजिक प्रश्न तसेच “कोणतेही पुस्तक, तुमचा दृष्टिकोन” असे विषय देण्यात आले होते. “साहित्य रंगमंच” उपक्रमात विद्यार्थ्यांनी सामाजिक विषय, राष्ट्रभक्ती, ग्रामीण विरुद्ध शहरी जीवन, नैतिकता व संस्कृती, युवा व स्वप्ने आणि परिवर्तन या विषयांवर प्रभावी सादरीकरणे केली. याशिवाय काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. या सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील १२८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
सामाजिक व वाचनविषयक जाणीव समाजापर्यंत पोहोचावी यासाठी ज्ञानेश्वर विद्यालय, श्री लक्ष्मीबाई दुराफे विद्यालय व राजे शिवछत्रपती विद्यालय येथे विस्तार उपक्रम राबविण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचन शर्यत (रीडिंग रेस), पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनाधीनतेपासून मुक्तीकडे जाणारा युवकाचा प्रवास, समवयस्कांच्या दबावामुळे होणारी व्यसनाची सुरुवात, व्यसनामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे, तंबाखू-मद्य यांसारख्या लहान व्यसनांतून मोठ्या व्यसनांकडे होणारी वाटचाल आणि समुपदेशन व पुनर्वसन केंद्रांची भूमिका यावर प्रबोधन करण्यात आले. या उपक्रमांत ४८३ शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभागाचे प्रमुख डॉ. राहुल बाराथे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. अरविंद वागस्कर, ग्रंथालय विभागातील सारिका पडवळ, आदर्श तांबे, सुवर्णा सानप तसेच विद्यार्थी स्वयंसेवक कुणाल तावरे, नम्रता गव्हाणे, सिद्धी रेड्डी, ब्रीद पुनिया, शुभम खुडे, नित्य पुंडे, कीर्ती पठाडे, रोहन धने व श्रुती परब यांनी परिश्रम घेतले.




