TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘एल निनोचं संकट आहेच, खरीप वाया गेलं’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा शेतकऱ्यांना दिलासा

परतीचा पाऊस पडल्यास रब्बीत काही हाती लागण्याची आशा; ‘पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करा, केंद्राची मदत घेऊ, त्यानंतरही राज्य सरकार मदत करेल’

El Nino Effect : यंदाच्या पावसातील मोठ्या खंडामुळे महाराष्ट्रातील शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अनेक भागांत खरीप पिकांचे नुकसान झाले असून, आता शेतकऱ्यांचे लक्ष परतीच्या पावसाकडे लागले आहे. राज्यातील 265 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, पावसाच्या कमतरतेमुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे.

या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. एल निनोच्या प्रभावामुळे पावसात खंड पडल्याचे त्यांनी नमूद केले. हवामान विभागाच्या अंदाजावर सरकार अवलंबून असते आणि हवामानाचे अंदाज काही वेळा अचूक ठरतात, तर काही वेळा बदलू शकतात, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

‘एल निनोचं संकट आहेच. पावसाळ्यात आता ऊन पडलं आहे. त्यामुळे दुष्काळ पडला आहे. परतीचा पाऊस पडावा, अशी ईश्वराला साकडं आहे. आमचा शेतकरी अडचणीत आहे. खरीप वाया गेलं आहे. पाऊस पडला तर रब्बीत काही हाती लागेल,’ असे भरणे यांनी सांगितले.

‘अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांसोबत’

शेतकऱ्यांना धीर देताना भरणे यांनी हा निसर्गाचा प्रकोप असून या संकटाचा सामना एकत्रितपणे करावा लागेल, असे म्हटले. शेती, पशुधन तसेच रोजगाराशी संबंधित अडचणींचा शासनाकडून आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

‘अडचणीच्या काळात सरकार तुमच्याबरोबर आहे. आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करू. गावात जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊ,’ असे भरणे यांनी म्हटले.

दरम्यान, 21 सप्टेंबर रोजीही भरणे यांनी एल निनोच्या प्रभावामुळे पावसात खंड पडल्याचे सांगत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन राहील, तसेच एनडीआरएफ आणि पीकविमा यंत्रणेतून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले होते.

हेही वाचा –  द्राक्ष आणि मनुका खाण्याचे आयुर्वेदिक फायदे; पचनापासून शरीराच्या पोषणापर्यंत मिळतो लाभ

पंचनाम्यांनंतर मदतीची प्रक्रिया

शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे कसे केले जाणार, याबाबत विचारले असता भरणे यांनी एनडीआरएफची मदत घेण्यात येईल आणि नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सांगितले. केंद्र सरकारकडून मदत घेण्याची प्रक्रिया सुरू असली तरी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारही शेतकऱ्यांना मदत करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारने 265 तालुक्यांत दुष्काळ घोषित केल्यानंतर संबंधित भागात पीक नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थेट पीक नुकसानभरपाईबाबतची मदत निर्धारित प्रक्रिया आणि प्रत्यक्ष नुकसानीच्या मूल्यांकनानंतर जाहीर केली जाणार आहे.

‘लवकरात लवकर मदत करू’

पंचनामे पूर्ण होण्यापूर्वीच आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्याबाबत भरणे म्हणाले की, शासनाची प्रक्रिया पूर्ण होऊ द्यावी. अधिसूचना काढण्यात आली असून, त्यानंतरची कार्यवाही वेगाने करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘आम्ही देखील शेतकरी आहोत. आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. शेतकऱ्यांचं दुःख आणि अडचणी आम्हाला ठाऊक आहेत. आम्हाला झोपताना शेती दिसते आणि सकाळी उठताना शेती दिसते. त्यामुळे लवकरात लवकर मदत करू,’ असे भरणे यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button