‘यायचं असेल तर आमच्यात या, आम्ही कुठेही जाणार नाही’; विलीनीकरणाच्या अफवांना शरद पवारांचा पूर्णविराम

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये सुरू असलेल्या सर्व चर्चांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. “आमच्या पक्षाबाबत सुरू असलेल्या चर्चांना काहीही अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात भक्कमपणे आणि पूर्ण ताकदीने काम करत आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला यायचे असेल त्यांनी आमच्यात यावे, आम्ही कोणातही सहभागी होणार नाही किंवा कुठेही जाणार नाही,” अशा स्पष्ट आणि आक्रमक शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला.
शरद पवार गट हा अजित पवार गटात जाणार किंवा काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशा चर्चा वारंवार माध्यमांमध्ये रंगत असतात. या सर्व चर्चा केवळ निरर्थक असल्याचे सांगत पवार यांनी पक्षाची स्वतंत्र आणि ठाम भूमिका स्पष्ट केली. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आणि विरोधकांना स्पष्ट संदेश देणारे मानले जात आहे.
हेही वाचा
विशेष लेख । आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करायला शिकूया : डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे
राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर बोलताना शरद पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “राज्यात भीषण दुष्काळ असून सरकारने काढलेल्या शासन निर्णयात (GR) अनेक गंभीर त्रुटी आहेत. या त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि दुष्काळग्रस्तांना दिलासा द्यावा, यासाठी मी मुख्यमंत्र्यांना कालच पुन्हा सविस्तर पत्र पाठवले आहे. सरकारने या पत्राचा गांभीर्याने विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी अशी माझी अपेक्षा आहे,” असे पवार म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला की, “आम्हाला उगीचच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची हौस नाही, आम्हाला दुष्काळग्रस्त जनतेला प्रत्यक्ष मदत मिळवून द्यायची आहे. मात्र सरकारने मदत केली नाही, तर आमच्यासमोर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा मार्ग मोकळा आहे.”





