Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शेतकऱ्यांच्या मदतीत कमतरता पडणार नाही’; बावनकुळेंचे प्रशासनाला युद्धपातळीवर पंचनाम्यांचे निर्देश

कळंब तालुक्यातील नरसापूर येथे दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी; डीसीएस ॲपवरील पीक पेरा नोंदणीची अडचण तातडीने सोडविण्याचे आदेश

मुंबई  : राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कळंब तालुक्यातील नरसापूर येथे दुष्काळग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती, वीजपुरवठा आणि पाण्याच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली. तसेच पीक पाहणी आणि नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

राज्य शासनाने ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांचाही समावेश आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पीक नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी शासन गतीने काम करत असून, शेतकऱ्यांच्या मदतीत कोणतीही कमतरता पडणार नाही, असे आश्वासन दिले. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याची शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणीबचतीच्या कामांनाही प्राधान्य देत पीक परिस्थितीचे अचूक मूल्यांकन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

डीसीएस ॲपवरील अडचणीची तातडीने दखल

पाहणी दौऱ्यादरम्यान डीसीएस ॲपवर पीक पेरा नोंदणी केल्यानंतर ती माहिती सॉफ्टवेअर किंवा संकेतस्थळावर प्रदर्शित होत नसल्याची बाब महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

बावनकुळे यांनी या तांत्रिक अडचणीची तातडीने दखल घेत अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी आयुक्त आणि जमाबंदी आयुक्त यांच्याशी कॉन्फरन्स कॉलद्वारे चर्चा केली. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून ही अडचण तातडीने सोडवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

हेही वाचा – दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; धुळ्यात पंचनामे, पाणी-चाऱ्याच्या नियोजनाला वेग

पंचनाम्यांमध्ये अचूकता ठेवण्यावर भर

दुष्काळग्रस्त भागातील पीक नुकसानीचे पंचनामे अचूक होणे महत्त्वाचे असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करावी आणि नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

दुष्काळ व्यवस्थापनाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील २६५ तालुके समाविष्ट करण्यात आले असून, परिस्थितीनुसार पुढील टप्प्यात इतर तालुक्यांचा समावेश करण्याची शक्यताही शासनाने खुली ठेवली आहे.

या पाहणी दौऱ्यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, खासदार संजय देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ॲड. प्रफुल्ल चव्हाण, नितीन भुतडा, प्रिया तोडसाम, आरती फुफाटे, देवानंद पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अभय देशपांडे, गटविकास अधिकारी अजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button