नागपुरात अतिविशेष दंतचिकित्सा केंद्राचे काम वेगाने; तीन महिन्यांत लोकार्पणाचे फडणवीस यांचे निर्देश
८० टक्के बांधकाम पूर्ण; डिजिटल डेंटिस्ट्रीसह सहा नवीन अतिविशेष विभाग, विदर्भासह मध्य भारतातील रुग्णांना मिळणार अत्याधुनिक उपचार

नागपूर : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कॅम्पसमधील प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिविशेषोपचार दंतचिकित्सा व संशोधन केंद्राचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील तीन महिन्यांत या केंद्राचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध अतिविशेष दंतचिकित्सा सुविधांनी सुसज्ज होणाऱ्या या केंद्रामुळे विदर्भासह मध्य भारतातील दंत रुग्णांना मोठा लाभ होणार असून, दंत शिक्षण आणि संशोधनालाही चालना मिळणार आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर ही संस्था १९६८ पासून कार्यरत आहे. विदर्भ आणि मध्य भारतातून मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचारासाठी येतात. दररोज किमान ५०० रुग्ण या संस्थेच्या आरोग्यसेवेचा लाभ घेतात. या पार्श्वभूमीवर अतिविशेष दंतचिकित्सा सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी या केंद्राची उभारणी करण्यात येत आहे.
४,७७० चौ. मीटर क्षेत्रात अत्याधुनिक केंद्र
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे २२,००२ चौ. फूट जागेचे संपादन करण्यात आले असून, केंद्राचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे ४,७७०.१२ चौ. मीटर आहे. प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून, बांधकामाच्या गुणवत्तेसाठी आणि नियोजनासाठी तांत्रिक मान्यताही देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन ४ जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते.
हेही वाचा – ‘शेतकऱ्यांच्या मदतीत कमतरता पडणार नाही’; बावनकुळेंचे प्रशासनाला युद्धपातळीवर पंचनाम्यांचे निर्देश
८० टक्के काम पूर्ण
केंद्राच्या इमारतीचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. विद्युतविषयक कामांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.
केंद्राच्या प्रभावी संचालनासाठी शासनाने नवीन पदांना मान्यता दिली आहे. एकूण ९१ पदांपैकी ६० पदे भरण्यात आली असून, उर्वरित पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.
कोट्यवधींच्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीची खरेदी
केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत सुमारे ३ कोटी ८९ लाख रुपयांच्या यंत्रसामग्री खरेदीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्य योजनेअंतर्गतही सुमारे ३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यंत्रसामग्री खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.
सहा नवीन अतिविशेष दंतचिकित्सा विभाग
शासकीय दंत महाविद्यालयात सध्या ६३ पदवीपूर्व BDS जागा, २४ पदव्युत्तर MDS जागा तसेच Fellowship आणि PhD अभ्यासक्रम सुरू आहेत. संस्थेला NAAC A+ श्रेणीकरण प्राप्त झाले आहे.
नवीन अतिविशेषोपचार केंद्राच्या माध्यमातून आधुनिक दंतचिकित्सा आणि विशेष उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामध्ये डिजिटल डेंटिस्ट्री, कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, ओरल इम्प्लांटोलॉजी, स्पोर्ट्स डेंटिस्ट्री, क्रॅनिओफेशियल सर्जरी आणि फॉरेन्सिक ओडोंटोलॉजी या सहा नवीन विभागांचा समावेश आहे.
रुग्णसेवा, शिक्षण आणि संशोधनाला चालना
या केंद्रामुळे जटिल दंतविकारांवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होण्याबरोबरच पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आधुनिक दंतचिकित्सा तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे रुग्णसेवा, दंत शिक्षण आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रांना एकाच वेळी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उर्वरित कामांना गती देऊन केंद्र निर्धारित कालावधीत कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील रुग्णांसाठी नागपुरात अत्याधुनिक अतिविशेष दंतचिकित्सा उपचारांचे महत्त्वाचे केंद्र उपलब्ध होणार आहे.





