Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सिंधुदुर्गातील प्रत्येक बाधित शेतकऱ्याला मदत मिळणार; नितेश राणेंचे प्रशासनाला निर्देश

पीक नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करा; भूजल पातळी वाढविण्यासाठी जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करून मात करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यास प्राधान्य असून, जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बाधित शेतकऱ्याला मदत मिळेल, यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात दुष्काळसदृश परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामध्ये मोठा खंड पडल्याने खरीप पिकांवर परिणाम झाला असून, जिल्हा दुष्काळ व्यवस्थापनाच्या ‘ट्रिगर-१’मध्ये आला आहे. यापूर्वीही जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीने पर्जन्यमानातील तूट आणि पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत ‘ट्रिगर-१’ची शिफारस केली होती.

अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण न करता लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे परिस्थितीचा सामना करावा. शेतकऱ्यांना दिलासा देतानाच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. ‘ट्रिगर-२’च्या अनुषंगाने आवश्यक अहवाल वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीचे योग्य चित्र मांडणारा असावा, अशा सूचनाही राणे यांनी दिल्या.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करा

पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देताना तांत्रिक अडचणी अडथळा ठरू नयेत, यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. कृषी विभागासह संबंधित विभागांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. शासनाच्या मदतीचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक माहिती अचूकपणे संकलित करण्याचे निर्देशही देण्यात आले.

पावसाच्या खंडामुळे भातपिकांसह अन्य पिकांच्या नुकसानीचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी व मदतीसाठी कार्यवाही सुरू असल्याचे अलीकडील अहवालांतही नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा –  दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; धुळ्यात पंचनामे, पाणी-चाऱ्याच्या नियोजनाला वेग

जलव्यवस्थापनावर भर

भविष्यात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासूनच जलव्यवस्थापनाचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे राणे यांनी सांगितले. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही छतावरील पावसाचे पाणी संकलित करण्याच्या पर्यायांचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. ग्रामपंचायत स्तरावरील लोकप्रतिनिधींनीही जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे उभारणार

भूजल पातळी वाढविण्यासाठी जिल्ह्यात दरवर्षी सुमारे पाच ते सहा हजार कच्चे बंधारे उभारले जातात. यंदाची परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे लोकसहभागातून उभारण्याचे निर्देश पालकमंत्री राणे यांनी दिले.

या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थी, स्काऊट-गाईड तसेच नागरिकांचा सहभाग घेऊन व्यापक मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पक्के अर्थात सिमेंट बंधारेही सुस्थितीत आणण्याचे निर्देश देण्यात आले. सध्या जिल्ह्यात ८२० पक्के बंधारे सुस्थितीत असून ३४७ बंधारे नादुरुस्त आहेत. नादुरुस्त बंधारे तातडीने वापरात आणण्यासाठी अंदाजपत्रके तयार करून कामांना गती द्यावी, तसेच बांधकाम, दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रभावी सनियंत्रण करावे, असे राणे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील भूजल पातळीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबवावी, अशी सूचना आमदार निलेश राणे यांनी केली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्षांनीही परिस्थितीचा फेरआढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा आढाव्यात समावेश

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची पद्धत, पेरणीची स्थिती, भूजल पातळी आणि प्रमुख जलसाठ्यांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा सादरीकरणातून मांडला.

आमदार दीपक केसरकर ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले. त्यांनी धडक बंधारा बांधकाम मोहीम राबविण्यासह पिण्याच्या पाण्याच्या बचतीबाबत जनजागृती करण्याची मागणी केली. आमदार निलेश राणे यांनी बाधित शेतकऱ्यांना मदत देताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचावी, यासाठी प्रशासनाने कार्यवाही करण्याची सूचना केली.

बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रभाकर सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button